Parbhani News :  परभणीच्या मानवत शहरात रामनवमी शोभायात्रेमध्ये पोलिसांनी डीजेला परवानगी नाकारल्याने रागाच्या भरात दोन तरुणांनी विषारी द्रव्य प्राशन केले. या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान या घडलेल्या घटनेमुळे मानवतमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांनी मानवत गाठत परिस्थिती निवळली.


आज रामनवमी निमित्त राज्यभरात ठिकठिकाणी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आज संध्याकाळी मानवत येथे रामनवमीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेमध्ये डीजे लावण्यावरून पोलिसांमध्ये आणि काही तरुणांमध्ये वाद झाला. पोलिसांनी नियमांवर बोट धरत डीजेला परवानगी नाकारली. मात्र, डीजेला परवानगी का नाकारली असे म्हणत शुभम दहे आणि शिवप्रसाद बिडवे या तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अचानकपणे या गदारोळात दोन तरुणांनी थेट खिशातील विषारी द्रव्य काढून प्राशन केले. या तरुणांनी असा प्रकार केल्यानंतर तात्काळ शोभयात्रेतील इतर कार्यकर्ते आणि सामान्यांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पहिल्यांदा मानवत व नंतर परभणी येथे दाखल केले. 


सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे मात्र या घटनेमुळे मानवत मधील रामनवमी शोभायात्रेवर विरजण पडले आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांनी घटना घडल्यानंतर मानवत गाठले आणि परिस्थितीची पाहणी केली. सध्या सर्व परिस्थिती निवळली असून नियंत्रणात आहे. मात्र, या प्रकरणात स्थानिक पोलीस निरीक्षक दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या तरुणांच्या नातेवाईकांनी केली आहे. 


बदलापुरात राम नवमीच्या पालखीत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन


ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर जवळ  वांगणीत रामनवमी निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन झालं. पवित्र रमजान महिन्यात आलेली रामनवमी हा दुग्धशर्करा योग्य असल्याचं सांगत मुस्लिम धर्मियांनीही भक्तिभावाने रामनवमीच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. वांगणी गावात 1826 सालापासून रामनवमी उत्सव साजरा होतोय. या उत्सवाचं यंदा तब्बल 197 वावं वर्ष आहे. वांगणी गावात हिंदू आणि मुस्लिम धर्मीय अनेक वर्षांपासून एकोप्याने राहतायत. रामनवमीच्या पालखी सोहळ्यातही मुस्लिम धर्मीय उत्साहाने सहभागी होतात. आजही वांगणी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यानंतर मुस्लिम मोहल्ल्यासह संपूर्ण गावात ही पालखी फिरली. या पालखीत घोडे, रथ यासह वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वांगणी गावातील ही पालखी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतिक असल्याचं यावेळी गावातील हिंदू आणि मुस्लिम धर्मियांनी सांगितलं.