Success Story : परभणी (Parbhani) जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात असणाऱ्या तीन तरुण शेतकऱ्यांनी मशरुम उत्पादनाचा (Mushroom farming) यशस्वी प्रयोग केला आहे. उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता या तरुणांनी मशरूम उत्पादनातून आर्थिक प्रगती साधली आहे. परभणी जिल्ह्यातील मुरुंबा (Murumba) गावात मशरुम शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. योगेश झाडे बीएस्सी अॅग्री, मंगेश चोपडे आणि दिलीप देशमुख अशी या तीन उच्चशिक्षित तरुणांची नावे आहेत. 


योगेश झाडे यांच्या घरी वडिलांची 15 एकर जमीन आहे. त्यांनी स्वतः कृषी विषयातून पदवी घेतली आहे. पारंपारिक पिकांच्या माध्यमातून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं या तीन तरुणांनी एकत्र येत दुष्काळी पट्ट्यात मशरुमचा यशस्वी प्रयोग करत आर्थिक प्रगती साधलीय. थंड प्रदेशात येणारे मशरूम दुष्काळी पट्ट्यात आले आहे.


कमी खर्चात मशरुम उत्पादनासाठी शेडची निर्मिती


परभणीच्या मुरुंबा गावातील तरुण योगेश झाडेने बीएस्सी अॅग्री तर मंगेश चोपडे आणि दिलीप देशमुख या दोघांनी कॉमर्सच्या पदव्या घेतल्या आहेत. वडिलांच्या गावात असणाऱ्या शेतीत कायम पारंपरिक पीक घेऊन वर्षाकाठी हाती काहीच लागत नव्हते. त्यामुळं शेतीत नवीन काही तरी करायचे या तिघांनी ठरवले. त्यानंतर तिघांनी मशरुम घेण्याचा निर्णय केला. त्याबाबत प्रशिक्षण घेऊन मंगेशच्या शेतातील केवळ दोन गुंठ्यात त्यांनी तुराट्या आणि ज्वारीच्या कडब्याचे शेड उभारले. त्याला आतून आणि बाहेरून ग्रीन मॅट लावली. शिवाय आतून बारदाण्याचे अच्छादनही दिले. बाबूंचे टेबल तयार केले असा हा कमी खर्चात त्यांनी मशरुम उत्पादन करण्यासाठी आसपास उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून शेड उभारले.


नेमकं मशरूम उत्पादन होते कसे?


गव्हाचा किंवा सोयाबीनचा भुस्सा घेऊन 100 लिटर पाण्यात 150 ml formalin आणि 12gm bavestin मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण घेतलेला भुसा त्या पाण्यात 12 ते 14 तास भिजू घालायचा. भिजलेला भुसा बाहेर काढून मोकळा करायचा. त्यात 60 टक्के आद्रता झाल्यास त्या भुस्यामध्ये (spawn) मशरुम बीज टाकून पॉलिथिनमध्ये भरुन घ्यायचे. त्यानंतर ते बेड एका हवा बंद रुममध्ये ठेवायचे. ज्या रुमचे तापमान 20 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस आणि आद्रता 60 टक्के ते 70 टक्के असावी. 15 दिवसानंतर ते बेड पांढरे शुभ्र पडल्यावर मोकळे करुन ठेवायचे. बेड मोकळे केल्यावर त्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी मारायचे. 25 दिवसानंतर त्यावर मशरूम यायला सुरुवात होते. मशरूम पीक हे साधारण 45 दिवसाचं असते.


खर्च जाऊन दीड महिन्यात जवळपास 30 ते 35 हजारांचा फायदा


मशरुम हे 45 दिवसांचे पीक आहे. 45 दिवसांच्या कालावधीमध्ये तीन वेळा याची काढणी करता येते. ज्यात पहिल्यांदा 25 व्या दिवशी त्यानंतर 35 व्या आणि शेवटची काढणी ही 45 व्या दिवशी घेतली जाते. हे मशरुम काढल्यानंतर याचे पॅकेजिंग 200 ग्रॅम, 400 ग्रॅम आणि 1 किलो अश्या मागणीप्रमाणं केली जाते. ज्याला 300 रुपये प्रति किलो दर त्यांनी निश्चित केला आहे. सुरुवातीच्या दिवसापासून ते शेवटची काढणी करेपर्यंत सर्व मिळून उत्पादन खर्च हा सहा हजारांपर्यंत येतो. याचे उत्पन्न हे 40 हजारांच्या आसपास होते. सगळा खर्च जाऊन या तरुणांना 45 दिवस म्हणजे दीड महिन्यात जवळपास 30 ते 35 हजारांचा फायदा होतो..


 बाजारपेठ मिळण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर


कुठल्याही उत्पादनाला बाजारपेठ मिळणे गरजेचे असते. या तरुणांनी हेच लक्षात घेऊन बाजारपेठ मिळण्यासाठी सोशल मीडियाचा अतिशय योग्य प्रकारे वापर केला. ज्यामध्ये त्यांना यश आले. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअँप आणि इंस्टाग्राम यावर हे तरुण मशरुमच्या उत्पादन आणि विक्रीबाबत नियमित पोस्ट करतात. त्यावर त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून स्वतः जिल्हाधिकारी अनेक डॉक्टर आणि इतरांनी त्यांच्या या उत्पादन प्रक्षेत्राला भेट देऊन मशरुम खरेदी करत त्यांचे कौतुक केले आहे. 


 मोठ्या कंपन्यांनाही मशरुमची विक्री करण्याचा मानस


सध्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या तीन तरुणांनी मशरुम उत्पादन घेतले आहे. त्यातच योग्य मार्केटिंग आणि मिळत असलेला दर पाहता येणाऱ्या काळात मशरुम उत्पादन हे केवळ नागरिकांना नाही तर मोठ्या कंपन्यांनाही विक्री करण्याचा या तिघांचा मानस आहे. त्याच दृष्टीने त्यांनी पारंपारिक पीक पद्धतीत बदल करुन नाविन्यपुर्ण मशरुमचे उत्पादन घेतले आहे. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी निश्चित आशादायी आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Jungly Mushroom : मटनापेक्षाही महाग मशरुम! गोंदियाच्या बाजारपेठेत महागड्या 'जंगली मशरुम'ची चर्चा