Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठ्या घडामोडी घडणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे बंडाच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांच्या संभाव्य भूमिकेवरून राष्ट्रवादीतही मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या निर्णयासोबत असल्याचे मत काही आमदारांनी व्यक्त केले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणुन कुणासोबतही जाणार नाही मात्र एखादा आमदार त्याच्यावर ईडी किंवा सीबीआयची धमकी देऊन जर तो नाईलाजानी जात असेल तर ते सांगता येत नाही, असे फौजिया खान यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार डॉ. फौजिया खान या परभणीच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी सोडण्याची चर्चा असल्याचा प्रश्न विचारला असता त्यांनी हे सूचक विधान केले. शिवाय राष्ट्रवादीच नाही तर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर ईडी आणि सीबीआय धाक तसेच विविध आमिष दाखवून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून जाणार का या शंकेला वाव मिळाला आहे.
अजित पवारांबाबत चर्चा का?
काही दिवसांपूर्वी अजित पवार ताफा सोडून खासगी गाडीत बसून गायब झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी मी कुठेही गायब झालो नव्हतो. माझी तब्येत ठीक नव्हती, पित्ताचा त्रास झाला होता, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवारांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यात आले होते.
अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर भाजपने दिली असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्यासोबत 35-40 आमदार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबतच्या आघाडीला नकार दिला असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्यात पक्ष फोडण्याचा सिझन-2 सुरू होणार असल्याचे रोखठोक या सदरात म्हटले होते. त्यामुळे अजित पवार हे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.