Marathwada Unseasonal Rain : मराठवाड्यात (Marathwada) शुक्रवारी (7 एप्रिल) रात्री आणि शनिवारी (8 एप्रिल) रोजी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे फळपिकांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यात नऊ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर, हिंगोली,परभणी आणि बीडमध्ये वीज पडून प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.  मराठवड्यात या दोन दिवसांत एकूण 54 जनावराचा मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही अनेक शेतकऱ्यांची रब्बीची पिके शेतात उभी असून, काहींनी पिके काढून गंजी लावली आहे. त्यामुळे या अशा पिकांचे देखील अवकाळीमुळे मोठं नुकसान झाले आहे. 

वीज पडून चौघांचा मृत्यू...

शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज पडून चौघांचा मृत्यू झाला आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा येथील आबादान भिका राठोड (वय 27 वर्षे) या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथील इंदुमती नारायण होडे (वय 60 वर्षे) या शेतात कापूस वेचत असताना सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच बीडच्या आष्टी तालुक्यातील सूरडी गावातील शेतकरी महादेव किसन गर्जे (वय 60 वर्षे) शेतात शेळ्या चरण्यासाठी गेले असता पाऊस सुरु झाला. त्यामुळे आश्रयासाठी ते झाडाखाली थांबले असताना त्यांच्यावर वीज पडली. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आणखी एका घटनेत हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील बोरजा येथील शेतात हळद गोळा करणाऱ्या पिराजी विठ्ठल चव्हाण (वय वय 33 वर्षे) यांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे. 

दोन दिवसांत 54 जनावरांचा मृत्यू 

अ.क्र. जिल्ह्याचे नाव  मृत संख्या 
1 छत्रपती संभाजीनगर  13
2 जालना  04
3 बीड  17
4 धाराशिव  07
5 नांदेड  03
6 हिंगोली  01
7 लातूर  09
  एकूण  54

पुन्हा पावसाचा अंदाज...

गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असताना, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Weather : राज्यात अवकाळीचा कहर, बळीराजा संकटात; आजही काही भागात पावसाचा यलो अलर्ट