Maharashtra HSC Exam : बारावी इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी (Copy) तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात (Teacher) अखेर गुन्हा दाखल झाला आहे. या सहा शिक्षकांना अटेक देखील करण्यात आली आहे. कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावं आहेत. बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवलं जात असतानाच शिक्षकांनीच या अभियानाला हरताळ फासल्याचं समोर आलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
राज्यभरात काल (21 फेब्रुवारी) बारावीच्या परीक्षांना (HSC Exam) सुरुवात झाली. पहिला पेपर इंग्रजीचा होता. परभणी जिल्ह्याच्या सोनपेठमध्ये चक्क परीक्षा केंद्र असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनीच इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत असल्याचा धक्कादायक प्रकार सोनपेठ पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी रात्री उशिरा उपकेंद्र संचालक कालिदास कुलकर्णी, इंग्रजी शिक्षक बालाजी बुलबुले, जिजामाता विद्यालयाचा शिक्षक गणेश जयतपाल, शिक्षकरमेश मारोती शिंदे, शिक्षक सिद्धार्थ सोनाळे, शिक्षक भास्कर तिरमले या जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
कसा फोडला पेपर?
परभणीच्या सोनपेठ शहरालगत असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीचा इंग्रजीचा पेपर अकरा वाजता देण्यात आला. हा पेपर देताच दोन शिक्षकांनी त्याचा फोटो काढून व्हॉट्सअॅपद्वारे इतर शिक्षकांना पाठवला. हे शिक्षक महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका खोलीत बसून त्याची विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत होते. ही बाब समजताच सोनपेठ पोलीस ठाण्याच्या एका पथकाने त्यांना पकडले. काल दिवसभर या सर्व प्रकाराची चौकशी पोलिसांनी केली. रात्री पोलिसांकडून शिक्षण विभागाला याबाबत अहवाल देण्यात आला. त्यानंतर काल रात्री उशिरा या प्रकरणात या सहा शिक्षकांवर महाराष्ट्र विद्यापीठ,मंडळाच्या व इतर विधिनिष्ठ परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 कलम 5,7,8,नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या सहाही जणांना अटक करण्यात आली आहे.
शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान, मात्र...
दरम्यान एकीकडे शिक्षण मंडळ कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. बैठे पथक, भरारी पथक यासह पोलिसांची पथके परीक्षा केंद्राबाहेर तैनात करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे मात्र थेट परीक्षा केंद्रावरील शिक्षक अशाप्रकारे पेपर फोडून त्या विद्यार्थ्यांना कॉपी देण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
हेही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI