Parbhani News: राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर 'ईडी सरकार' म्हणून सतत विरोधकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान अशीच काही टीका आता रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकरांनी (Anandraj Ambedkar) केली आहे. 'ईडी सरकारमुळे महाराष्ट्र कमजोर झालाय' अशाा खोचक शब्दात आनंदराज आंबेडकरांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त परभणी येथे रिपब्लिकन सेनेचा स्वाभिमान मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या मैदानात झालेल्या कार्यक्रमात बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारमुळे वेदांता फॉक्स्कोन, बल्कड्रक्स पार्क, मेडिसीन डिवाईस पार्क, टाटा एअरबस, सेफ्रन ग्रुप चार असे 189580 कोटींचे प्रकल्प ईडी सरकारमुळे महाराष्ट्राबाहेर गेले. यामुळे राज्य कमजोर झाल्याचं स्वाभिमानी मेळाव्यात बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे. तर या देशामध्ये जे जे विरोधक आहेत त्यांना नामोहरम करण्याचे आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम केले जात आहे. जनता काही दुधखुळी राहिलेली नसून निवडणूक आल्यावर या सर्व गोष्टींचा हिशोब घेतील, असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले आहेत.
राहुल गांधींवर प्रतिक्रिया...
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयावर बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की,'ज्या दिवशी न्यायालयाचा निकाल येतो त्यानंतर राहुल गांधी यांना अपील करण्यासाठी 30 दिवसांचा कालवधी असताना दुसऱ्याच दिवशी त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा मला आश्चर्य वाटले. उद्या जर राहुल गांधी न्यायालयात आणि कोर्टाने स्थगिती दिल्यावर काय होईल हा महत्वाचा प्रश्न आहे. यावर मी जास्त भाष्य करू शकत नाही. परंतु या देशाचे काम एवढ्या वेगाने होत असल्याने आश्चर्य वाटत असून, या सर्व कामाभोवती संशयाचे वादळ निर्माण होत, असल्याचे आंबेडकर म्हणाले.
सरकारमध्ये जाताच चौकशी बंद होते...
या देशामध्ये जे जे विरोधक आहेत त्यांना नामोहरम करण्याचे आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम केले जात आहे. राज्यात देखील एक सरकार पडले आणि दुसरं सरकार स्थापन झाले. ज्यांच्या चौकशा सुरु होत्या त्या बंद करण्यात आल्या आहेत. चौकशी सुरु असलेला व्यक्ती सरकारमध्ये जाताच ते धुतलेल्या तांदळासारखे होतात. हे सर्व विचित्र असून, लोकांना देखील सर्वकाही कळत आहे. लोकं आता दुधखुळे राहिले नाही. त्यामुळे याचा हिशोब लोकं निवडणुकीत नक्कीच घेतील.
इतर महत्वाच्या बातम्या :
Nagpur News : माझं काम पटलं तर मत द्या, नाहीतर देऊ नका; मी आता लोणी लावणार नाही : नितीन गडकरी