Nagpur News : "लोकांना सांगतो आहे तुम्हाला पटलं तर मतं द्या, नाहीतर देऊ नका. मी आता फार काही लोणी लावायला तयार नाही," अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. नागपूरमध्ये (Nagpur) ते वनराई फाऊंडेशनच्या वतीने त्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नितीन गडकरी यांना रविवारी (26 मार्च) मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मी नाही तर माझ्या जागी दुसरा कोणीतरी येईल : नितीन गडकरी
जलसंवर्धन, वातावरणातील बदल आणि पडीक जमिनीचा योग्य वापर अशा क्षेत्रात प्रयोग करण्यासाठी भरपूर वाव आहे आणि त्या क्षेत्रात जिद्दीने काम करत आहे, असे गडकरी म्हणाले. "मी प्रेमाने नाहीतर ठोकून करतो," असं त्यांनी म्हटलं. "भविष्यात याच क्षेत्रात जोमाने काम करायचे आहे, कारण यामुळे भारताची अर्थव्यवस्था नाही तर ग्रामीण भागाचा चेहरामोहराही बदलू शकतो," असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. "आजवर भरपूर कामे केली आहेत. ती लोकांना पटली असेल तर लोक मतं देतील, नाहीतर देणार नाहीत. मी काही लोणी लावायला तयार नाही. मी नाही तर माझ्या जागी दुसरा कोणीतरी येईल. खरे म्हणजे मलाही या कामाला जास्त वेळ द्यायचा आहे आणि या कामातून भविष्य बदलू शकतं हे मला दिसतं," असं गडकरी म्हणाले.
राजकारण हा पैसे कमावण्याचा धंदा नाही : गडकरी
राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण. तर राजनीति म्हणजे लोकनीति, धर्मनीति आहे. सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातील उद्दिष्टे आहेत. त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरिबांची सेवा राजकारणातून होणं अपेक्षित आहे, असं नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील नामको हॉस्पिटलच्या प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल कार्डिअॅक केअर सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात म्हटलं होतं.
'राजकारणात सत्य सांगणे, काही कामाचं नसतं'
नाशिकच्या मोहाडी परिसरातील नामांकित सह्याद्री फार्म कंपनीच्या परिसरात बायोगॅस ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन समारंभात नितीन गडकरी यांनी राजकारणात सत्य सांगणे काही कामाचं नसतं, असं म्हटलं होतं. यश, ज्ञान यांवर कुणाचंही पेटंट नसतं. मी शरद जोशी यांच्या विचारांचे समर्थन करतो. ते नेहमी सत्य सांगायचे. पण राजकारणात सत्य सांगणे, काही कामाचं नसतं," असं नितीन गडकरी म्हणाले होते.