Parbhani News:  देशभरात आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे रस्त्याअभावी हाल कायम आहेत. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चितनरवाडी ग्रामस्थांनी आज स्वातंत्र्यदिनी चक्क ओढ्यातुन तिरंगा रॅली काढत अनोखं आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अनेकदा मागणी करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत नसल्याने अशाप्रकारे आंदोलन करण्याची वेळ आल्याचं गावकऱ्यांनी बोलून दाखवलं. 


आज स्वातंत्र्यदिनी गावकऱ्यांनी चितनरवाडी ते आडगाव दरम्यान दीड किलोमीटरची ओढ्यातून तिरंगा रॅली काढत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. चितनरवाडी हे गाव डोंगराळ भागात असून या गावाला रस्ता नसल्याने गावकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळेला महिलांची प्रसूती ही ओढ्यात तसेच डोंगरात होते. त्यामुळे गावकऱ्यांना रस्ता मिळावा या मागणीसाठी अनेक वेळेला विविध आंदोलन केली, धरणे केली परंतु प्रशासन असो वा लोकप्रतिनिधीं यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आज स्वातंत्र्यदिनी या गावकऱ्यांनी चक्क ओढ्यातून तिरंगा रॅली काढत निषेध नोंदवला आहे.


अख्ख गाव ओढ्यात उतरलं...


गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यात पावसाला सुरु झाला की,  ओढ्यात कंबरेएवढं पाणी असते. त्यामुळे गावकऱ्यांना आणि शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. अनेकदा पूर मोठ्याप्रमाणावर आल्यावर वाहतूक पूर्णपणे बंद होते. त्यामुळे आज करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनात गावातील महिला, पुरुषसह शाळकरी मुलांनी सुद्धा सहभाग नोंदवला. त्यामुळे तब्बल दीड किलोमीटरच्या ओढ्यातून तिरंगा रॅली काढत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला. त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येईल का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


काय म्हणाले गावकरी...


गेली शंभर वर्षे आमच्या गावाला रस्ता नाही. रस्ता मिळावा म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे. रुग्णालयात निघालेल्या महिलांची प्रस्तुती सुद्धा अनेकदा ओढ्यातच होते. आम्हाला आणखी काही नको फक्त रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा. आज देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय, पण एवढ्या वर्षात आमच्या गावाला साधा रस्ता करता आला नाही. त्यामुळे आम्हाला काहीतरी न्याय मिळावा. आतापर्यंत दहा वेळा वेगवेगळ्या ठिकाणी मागणी केली, पण कुणीच दखल घेत नाही. त्यामुळे आतातरी आम्हाला रस्ता करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Parbhani: राष्ट्रध्वजावर भाजपचे चिन्ह आणि नाव, काँग्रेसची तक्रार घेण्यास पोलिसांनी दिला नकार


Photo: तिरंगी विद्युत रोषणाईने परभणी शहर उजळून निघालं