Agriculture News : कापसावरील (Cotton) बोगस फवारणी औषध विक्री करणाऱ्या दोन जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापसावरील औषधांची बोगस विक्री करताना शेतकऱ्यांना दोन जणांना पकडले होते. या प्रकरणी तब्बल 30 तासानंतर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश तरोडकर आणि दत्ता शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मानवत परिसरामध्ये एका कारच्या माध्यमातून पेन्सी बायो या कंपनीचे बायो आर 303 हे बोगस फवारणी औषध विक्री केले जात असल्याची माहिती काही शेतकऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुनील बावळे, अर्जुन पंडित या दोन शेतकऱ्यांनी या कारचा पाठलाग करुन त्यांना पकडले. यामध्ये तब्बल 4 लाख 65 हजार 2376 रुपयांची बोगस औषधे असल्याचे शेतकऱ्यांना आढळून आले. यानंतर या शेतकऱ्यांनी सदर बोगस औषधांची गाडी मानवत पोलीस ठाण्यात आणली. या संदर्भामध्ये कृषी विभाग, गुण नियंत्रण पथक तसेच मूळ कंपनी प्रतिनिधीला कळवण्यात आले. त्यानंतर तब्बल 30 तासानंतर पेन्सी बायो या कंपनीचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन सतीश तरोडकर आणि दत्ता शिंदे यांच्या विरोधात 420, 465, 34 भादवी 1860 तसेच कलम 51, 63, 64 कॉपी राईट अधिनियम 1957 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील हे करत आहेत. सध्या ही सर्व बोगस औषधे पोलिसांनी जप्त केली आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर कृषी विभागाकडूनही करवाई केली जाणार आहे.
तब्बल 30 तासांनंतर गुन्हा दाखल
या प्रकरणात बोगस औषध पकडलेले शेतकरी सुनील बाबळे, रामराजे महाडिक, रमेश साठे अर्जुन पंडित यांच्यासह अनेक पदाधिकारी या प्रकरणात कारवाई करावी अशी मागणी करत होते. मात्र, नेमकी कारवाई कोणी करायची यातच कृषी विभागाचे अधिकारी, मूळ कंपनी पेन्सी बायो चे प्रतिनिधी यांच्यात संभ्रम होता. अखेर 30 तास उलटल्यानंतर पेन्सी बायो कंपनीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या सर्व कारवाईत कृषी विभागाकडून ज्या पद्धतीने कारवाई करणे अपेक्षित होते ते होताना दिसले नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: