Parbhani News: मुलीच्या जन्माचे स्वागत हे उत्सवाने व्हावे या उदात्त हेतूने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या मुलींना जिलेबी आणि सोन्याचे नाणे भेट देण्याचा अनोखा उपक्रम परभणीतील जिलेबी व्यावसायिकाकडून मागच्या 12 वर्षांपासून राबविण्यात येतोय. परभणी शहरातील आर.आर. टावर परिसरात असलेल्या हरियाणा जिलेबीचा मालक सनी सिंग हा मागच्या बारा वर्षापासून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात एक जानेवारी रोजी जन्मलेल्या मुलींना प्रत्येकी 2 किलो जिलेबी भेट देतो. सोबतच दिवसभरात जन्मलेल्या मुलींची नावं लकी ड्रॉ पद्धतीने काढून विजेत्या एका मुलीला दोन ग्राम सोन्याचे नाणेही भेट देण्यात येते. 


मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतात. अनेकदा यासाठी काही खाजगी संस्था देखील प्रयत्न करतात. दरम्यान असाच काही उद्देश ठेवत परभणी जिल्ह्यातील एका जिलेबी विक्री करणाऱ्या तरुणाकडून गेल्या 12 वर्षांपासून अनोखं उपक्रम राबिवले जात आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या मुलींना जिलेबी आणि सोन्याचे नाणे भेट देण्याचं त्याचं उपक्रम चर्चेचा विषय बनला आहे. दरवर्षी 1 जानेवारी रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्मलेल्या मुलींना प्रत्येकी 2 किलो जिलेबी आणि ड्रॉ पद्धतीने विजेता मुलीला 2 ग्राम सोन्याचे नाणे सनीकडून भेट दिले जाते. 1 जानेवारी 2023  रोजी देखील सनी सिंग याने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्मलेल्या 11 मुलींना प्रत्येकी 2 किलो जिलेबी आणि विजेता मुलगी शिवकण्या विजय देवकर या मुलीला 2 ग्राम सोन्याचे नाणे भेट दिले आहे.


वडिलांकडून मिळाली प्रेरणा....


मुळचा हरियाणा येथील सनी सिंग आणि त्याचे वडील गेल्या 42 वर्षांपासून परभणीत जिलेबीचा व्यवसाय करतात. परभणी शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या त्यांच्या जिलेबीच्या दुकान जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तर व्यवसाय करतांना आपल्या हातून समाजकार्य व्हावे म्हणून सनी दरवर्षी 1 जानेवारी रोजी मुलींचा जन्म होणाऱ्या पालकांना दोन किलो जेलेबी देऊन त्यांचा सत्कार करतो. तर आपल्या वडिलांकडून हा उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळाल्याच सांगतानाच, यामुळे लोकांचे आशिर्वाद मिळत असल्याची भावनाही सनी सिंग याने बोलतांना व्यक्त केली. 


'नाम के साथ दुवा...'


याबाबत बोलतांना सनी सिंग म्हणतो की, आमची जिलबी प्रसिद्ध असल्याने दुकानाचं शहरात चर्चा आहे. पण नावासोबतच लोकांचे आशीर्वाद देखील मिळाले पाहिजे असे माझे वडील मला नेहमी सांगायचे. त्यामुळे यासाठी बराच विचार केल्यावर मला ही कल्पना सुचली. ज्यातून लोकांचे आशीर्वाद तर मिळतातच, पण मुली झालेल्या पालकांना एक पाठींबा म्हणून त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा आमच्याकडून प्रयत्न करतो. ज्यातून 'बेटी बचाव'चा संदेश देण्याचाही आमचा प्रयत्न असतो असेही सनी बोलतांना म्हणाला.