Parbhani Crime News: केंद्राने तीन तलाकवर (Triple Talaq) बंदी आणत कायदा केला असताना देखील असे प्रकार घडतच असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. असाच काही प्रकार आता परभणी जिल्ह्यात (Parbhani District) पाहायला मिळाला आहे. कारण एकाने चक्क पत्नीला  व्हॉट्सअॅपवरूनच व्हॉईस संदेशाद्वारे तलाक तलाक म्हणत तलाक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पिडीत पत्नीने पोलिसात धाव घेतली असून, या प्रकरणी परभणीच्या सेलू पोलिस ठाण्यात आरोपी पती विरुद्ध सोमवारी (27 मार्च) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख फहीम शेख सलीम (वय 23 वर्षे, रा. नारेगाव छत्रपती संभाजीनगर) असे आरोपी पतीचे नाव असून, शेख फिरदोस शेख फहीम (21, रा. आयशा पार्क नारेगाव, छत्रपती संभाजीनगर ह.मु. रा. अजंठा कॉलनी सेलू)  असे महिलेचे नाव आहे. 


आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर कोण कशासाठी करेल याचा नेमच राहिला नाही. आता परभणी जिल्ह्यातील एका विवाहित मुस्लीम महिलेला  पतीने चक्क मोबाइल व्हॉट्सअॅपवरूनच व्हाईस संदेशाद्वारे सात वेळा तलाक तलाक म्हणत तलाक दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे पत्नीने सेलू पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण! 


शेख फिरदोस यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पती शेख फहीम यांनी 16  मार्च रोजी दुपारी फिरदोस यांना मोबाईलवर फोन करून तु माझ्यासह नातेवाइकांविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल का केला, असे म्हणत मी तुला तलाक देतो असे सांगत मोबाईल बंद केला. अन् त्यानंतर व्हॉट्सअॅपवरूनच व्हॉईस संदेश पाठवला. यामध्ये सात वेळेस तलाक तलाक असे म्हटले आहे. त्यानंतर फिर्यादीच्या आईने आरोपीस मोबाइलवर फोन करून या संदेशाबाबत विचारले असता आरोपीने व्हॉट्सअॅपवरूनच तलाक दिल्याचे सांगितले. त्यामुळे फिरदोस यांच्या आईसह माहेरच्या लोकांना धक्काच बसला. 


महिलेची पोलिसात धाव...


दरम्यान या घटनेने पत्नीला धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी घडलेल्या घटनेबाबत नातेवाईक व मौलाना यांच्या सोबत विचारविनिमय करून आरोपी पतीविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात 27  मार्च रोजी गुन्हा दाखल केली. तर पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांचे आदेशाने आरोपी शेख फहीम शेख सलीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस जमादार शेख उस्मान हे करीत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या : 


पती आणि सासरच्या संपत्तीवर महिलेचा अधिकार किती? घटस्फोट झाल्यानंतर कोणते हक्क मिळतात? जाणून घ्या काय सांगतोय कायदा