Parbhani News : लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारी प्रेयसी अचानक घरातून निघून गेली. त्यानंतर अनेकदा विनंती करुन देखील ती परत येत नसल्याने प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील करम येथे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यावेळी आरोपी तरुणाने प्रेयसीच्या आईच्या प्रियकरालाही मारहाण केली असल्याचे समोर आले आहे. तर या घटनेनंतर आरोपी प्रियकर फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. बाळू मुंडे असे आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, मयत महिला ही प्रियकर पंडित लोंढे यांच्यासोबत राहत होती. महिलेची मुलगी ही आठ वर्षांपासून पतीपासून विभक्त राहून प्रियकर बाळू मुंडे याच्यासोबत परळीत राहत होती. मात्र तिचा प्रियकर चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी तिला मारहाण करायचा. नेहमीची मारहाण आणि भांडण याला कंटाळून मुलगी आईकडे करमला राहायला गेली. दरम्यान चार दिवसांपूर्वी बाळू मुंडे हा करम येथे येऊन प्रेयसीला म्हणजेच मयत महिलेच्या मुलीला माझ्यासोबत चल असे म्हणाला. मात्र तिने सोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे बाळू मुंडे याने मुलीच्या आईसोबत वाद घालायला सुरुवात केली. तुम्ही तिला माझ्यासोबत का पाठवत नाही, असे म्हणून वाद घालू लागला.
दरम्यान या घटनेनंतर सोमवारी (15 मे) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बाळू मुंडे याने प्रेयसीला फोन केला. "तू तुझ्या आईच्या जिवावर राहतेस. तुझ्या आईलाच संपवून टाकतो," अशी फोनवरून धमकी दिली. त्यानंतर त्याच दिवशी रात्री दहा वाजेच्या सुमारास बाळू मुंडे याने प्रेयसीच्या वहिनीला फोन केला. ज्यात तुझ्या सासूला आणि त्याचे प्रियकर पंडित लोंढे यास मारहाण झाली आहे, असे सांगितले. त्यामुळे प्रेयसीची वहिनी घटनास्थळी पोहोचली असता, सासूच्या गळ्यावर, पाठीवर, डोक्यावर धारदार वस्तूने वार केल्याचे दिसले. तसेच पुढे घराच्या दरवाजामध्ये पंडित लोंढे हा रक्ताच्या थारोळ्यात जखमी दिसले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना
एका महिलेचा धारदार शस्त्राने सोमवारी (15 मे) रात्री दहाच्या सुमारास हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर मयताच्या सुनेच्या फिर्यादीवरुन सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी हा फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: