परभणी : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. परभणीच्या (Parbhani) जिंतूर विधानसभा मतदारसंघात (Jintur Assembly Constituency) भाजपच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मेघना बोर्डीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे.
मेघना बोर्डीकर यांच्या संपत्तीत (Meghna Bordikar Property) मागील पाच वर्षात तीन पटीने वाढ झाली आहे. तर त्यांच्यावर एकूण सात कोटी 74 लाखांचे कर्ज देखील आहे. 2019-20 साली 61 लाख 90 हजार एवढे वार्षिक उत्पन्न असलेल्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे 2023-24 मध्ये हेच उत्पन्न तीन पटीने वाढून 1 कोटी 70 लाख 43 हजार रुपये एवढे झाले आहे.
एकूण जंगम मालमत्ता
मेघना बोर्डीकर यांच्याकडे 9 कोटी 44 लाख 16 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे रोख एक लाख 85 हजार 918 आहेत. सात लाख 43 हजार रुपयाचे सोने असून 78 हजार रुपयांची सोन्याचे दागिने आहेत. मेघना बोर्डीकर यांच्या विविध बँक खात्यात, तसेच शेअर्स बोंड यामध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे.
स्थावर मालमत्ता
21 कोटी 74 लाख 45 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आमदार मेघना बोर्डीकरांकडे आहे. त्यांच्याकडे 18 हेक्टर शेतजमीन असून त्याची बाजार मूल्य पाच कोटी 29 लाख 57 हजार एवढे आहे. त्यांच्याकडे असलेल्या बिगर शेती जमिनीचे बाजार मूल्य 11 कोटी 49 लाख 11 हजार एवढे आहे. पुण्याच्या वडगाव शेरी येथे वाणिज्यिक इमारत असून तिचे बाजारमूल्य 3 कोटी 72 लाख 54 हजार एवढे आहे. आमदार बोर्डीकरांचे ठाणे जिल्ह्यातील मानपाडा येथे राहते घर असून त्याची किंमतही एक कोटी 23 लाख 21 हजार रुपये एवढी आहे.
मेघना बोर्डीकर यांच्यावर सात कोटींचे कर्ज
आमदार मेघना बोर्डीकर यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून तीस कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर विविध बँकांचे सात कोटी 74 लाख 12 हजार रुपयांचे कर्ज आहे. आमदार मेघना बोर्डीकर यांच्यावर तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी दहा गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर दोषारोप पत्र सिद्ध करण्यात आले आहे. तर दोन गुन्ह्यांमध्ये अद्यापही दोषारोप सिद्ध करण्यात आला नाही. जे ज्या दहा गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर दोषारोप सिद्ध करण्यात आला आहे त्यामध्ये कोरोना काळात आंदोलन केल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर एका गुन्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास निष्काळजीपणे क्रेनमध्ये बसून हार घालून वाहतुकीस अडथळा केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा