परभणी : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण अधिकच तापतांना पाहायला मिळत आहे. अशात उमेदवारांकडून एकमेकांवर टीकेचे बाण सोडले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे (Thackeray Group) परभणी लोकसभा मतदारसंघातील (Parbhani Lok Sabha Constituency) उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'कोण कुठला महादेव जानकर, साताऱ्यामधला इथं येऊन निवडणूक लढवतोय. नागरिकांना काही काम असल्यास तू साताऱ्यातून येणार का? असा खोचक टोलाही जाधवांनी जानकरांना लगावला आहे. 


दरम्यान एका गावात प्रचारसभेत बोलतांना संजय जाधव म्हणाले की, “विरोधक आता जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम करू शकतात. कारण त्यांच्याकडे निवडणुक लढवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मुद्दा राहिलेला नाही. कोण कुठला महादेव जानकर, साताऱ्यामधला तो परभणीमध्ये येऊन निवडणूक लढवतो. उद्या इथल्या नागरिकांचं काही काम पडलं, तर तू साताऱ्याहून करणार का?, पोलीस ठाण्याचे काम असेल किंवा आरटीओचं काम असेल अन्यथा दवाखान्याचा काम असेल, मी शिवसैनिक आपल्यासाठी 24 तास उपलब्ध असल्याचे संजय जाधव यांनी म्हटले. परभणीच्या पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील ग्रामस्थांशी ते बोलत होते. 


काहींनी गद्दरी केली...


महाविकास आघाडीतील उद्धव सेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी थेट गाव भेट दौरा आखला असुन, पाथरी तालुक्यातील अनेक गावांत ते प्रचारासाठी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी वाघाळा गावात बोलत असतांना त्यांनी महादेव जानकर आणि भाजपला लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख प्रामाणिकपणे राज्य चालवत असतांना काहींनी गद्दरी केली. शिवसेना पक्षासह चिन्हाची चोरी करत उद्धव ठाकरे संपल्याची भाषा करणारे गद्दार सकाळी उठल्यापासुन उद्धव ठाकरेंवरवर टिका करतात. आता जनता तुम्हाला संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे संजय जाधव म्हणाले. 


परभणी मतदारसंघात पक्षाकडून मैदानात असलेले उमेदवार


आलमगीर मोहम्मद खान, संजय हरिभाऊ जाधव, कैलास बळीराम पवार, डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे, महादेव जगन्नाथ जानकर, दशरथ प्रभाकर राठोड, पंजाब उत्तमराव डख, राजन रामचंद्र क्षीरसागर, विनोद छगनराव अंभुरे, शेख सलिम शेख इब्राहिम, सयद इरशाद अली, संगीता व्यंकटराव गिरी, श्रीराम बन्सीलाल जाधव यांचा समावेश आहे.


परभणी मतदारसंघात अपक्ष उमेदवार


अनिल माणिकराव मुदगलकर, अर्जुन ज्ञानोबा भिसे, आप्पासाहेब ओंकार कदम, शिवाजी देवजी कांबळे, कारभारी कुंडलिक मिठे, किशोर राधाकिशन ढगे, किशोरकुमार प्रकाश शिंदे, कृष्णा त्रिंबकराव पवार, गणपत देवराव भिसे, गोविंद रामराव देशमुख, बोबडे सखाराम ग्यानबा, मुस्तफा मैनोदिन शेख, राजाभाऊ शेषराव काकडे, राजेंद्र अटकळ, विजय अण्णासाहेब ठोंबरे, विलास तांगडे, विष्णुदास शिवाजी भोसले, समीरराव गणेशराव दुधगावकर, सय्यद अब्दुल सत्तार, सुभाष दत्तराव जावळे, ज्ञानेश्वर जगन्नाथ दहिभाते हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


परभणीत 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात! जाधव मारणार बाजी की जानकर उधळणार भंडारा?