Marathwada Unseasonal Rain : एकीकडे मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात पाणी संकट (Water Crisis) निर्माण झाले असतानाच, दुसरीकडे त्याच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. विभागातील बीड (Beed), हिंगोली (Hingoli), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded) जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहेत. काही ठिकाणी तर वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे. 


बीडमध्ये तासभर पाऊस, वीज कोसळून गाय ठार


मंगळवारी मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यात देखील हजेरी लावली. जिल्ह्यात सकाळपासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. मात्र, दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा अवकाळी पावसाला सुरवात झाली. जवळपास एक तास पाऊस सुरू होता. यावेळी अंबाजोगाई, धारूर, परळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. तर, काही ठिकाणी दुपारच्या सुमारास पाऊस पडल्याने नागरिकांना उष्णतेच्या त्रासातून काही वेळ दिलासा मिळाला. तसेच, धारूर तालुक्यातील मोरफळा येथे वीज पडून एक गाय ठार झाली आहे. 


नांदेडात जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस 


बीडप्रमाणे नांदेड जिल्ह्यात देखील मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशावर पोहचल्याने नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत होता. अशात मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. नांदेड शहरासह कंधार, लोहा, अर्धापूर यासह अनेक तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 


हिंगोलीत शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान...


हिंगोली जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील मसोड गावाच्या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पहायला मिळत आहे. शेतामध्ये उभ्या असलेल्या ज्वारीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. लक्ष्मण सातव या शेतकऱ्याच्या शेतातील दीड एकर ज्वारीच्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. काढणीला आलेलं ज्वारीचे पीक जमीनदोस्त झालं आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. 


मिरचीच्या पिकाचे अतोनात नुकसान 


हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी मसोड गावाच्या शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. या गारपेटीचा फटका भाजीपाला वर्णीय पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अशोक सातव या शेतकऱ्याच्या शेतातील दीड एकर मिरचीला या गारपिटीचा फटका बसलाय. साधारणता एक लाख रुपये खर्च करून लहानाचे मोठे केलेल्या मिरचीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. गारांचा मार लागल्यामुळे झाडाला असलेल्या मिरच्या तुटून जमिनीवर पडल्या आहेत. त्यामुळे शेतामध्ये सगळीकडे मिरच्यांचा सडाच पाहायला मिळतोय. या गारपिटीमुळे शेतकरी अशोक सातव यांचं दोन लाख रुपयाचं नुकसान झाल्याचं शेतकरी सांगताहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


विदर्भात अवकाळीसह गारपरीटीचा तडाखा, आंब्यासह लिंबू भाजीपाला पिकांना मोठा फटका