परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Loksabha Election) आज (8 एप्रिल) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस होता. या शेवटच्या शेवटच्या दिवशी केवळ 7 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदारसंघात एकूण 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. यामध्ये महायुतीकडून महादेव जानकर (Mahadev Jankar) महाविकास आघाडीकडून संजय जाधव (Sanjay Jadhav) वंचित बहुजन आघाडीकडून पंजाब डख (Punjab Dakh) निवडणूक लढवतील. या तीन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह इतर 31 उमेदवार आपलं भवितव्य आजमवणार आहेत.


निवडणुकीच्या रिंगणात 34 उमेदवार 


महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न झाले. मात्र यात त्यांना फारसे यश आलेले नाही. उमदेवार अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे येथे आता एकूण 34 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. प्रत्यक्ष 34 उमेदवार निवडणूक लढवत असले तरी प्रत्यक्ष तीनच उमेदवारांत थेट लढत होण्याची शक्यता आहे. महादेव जानकर, संजय जाधव आणि पंजाब डख हेच ते तीन नेते आहेत. 


संजय जाधवांना जोर लावावा लागणार


या मतदारसंघावर तसे नेहमीच शिवसेनेचे वर्सस्व राहिलेले आहे. भाजप-शिवसेनेची युती असताना भाजपने हा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेला दिलेला आहे. आता मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीचा भाग आहे. सध्या या मतदारसंघाचे खासदार संजय जाधव असून ते ठाकरे गटात आहेत. गेल्या वेळी भाजपने त्यांचा प्रचार केला होता. मात्र आता संजय जाधव यांच्या पाठीमागे भाजप नसेल. परिणामी पुन्हा एकदा विजयी कामगिरी करण्यासाठी संजय जाधव यांना चांगली ताकद लावावी लागणार आहे. 


जानकर यांची भाजप, शिवसेनेवर मदार 


महादेव जानकर येथे महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे या जिल्ह्यात म्हणावे तेवढे प्राबल्य नाही. त्यांचा हा पक्ष सर्वदूर पोहोचलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जानकर यांच्या पक्षाचा तरुण, शेतकरी, व्यापारीवर्गामध्ये जनसंपर्क नाही. त्याचाही फटका जानकर यांना बसू शकतो. परिणामी त्यांना एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच भाजपच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. भाजपा, शिवसेनेच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी साथ दिली, तरच ते निवडून येऊ शकतात.


वंचित, अपक्ष उमेदवारांचा फटका बसणार


दरम्यान,  वंचित बहुजन आघाडीनेदेखील या मतदारसंघातून आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे  वंचितचा उमेदवार संजय जाधव यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. दुसरीकडे इतर अपक्ष उमेदवारांमुळे जानकर यांनादेखील मतफुटीला तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.