परभणी : मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी शासनाने न्यायमूर्ती (निवृत्त) संदीप शिंदे समिती (Shinde Committee) स्थापन केली आहे. सदर समिती प्रत्येक जिल्ह्यात सापडलेल्या नोंदीचा वेळोवेळी आढावा घेत आहे. असे असतांना परभणी जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी (Kunbi Records) कमी असल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी स्वतः परभणीचा दौरा करून पुन्हा काळजीपूर्वक नोंदीची फेरतपासणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 


परभणी जिल्ह्यात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलतांना मधुकरराजे आर्दड म्हणाले की, "मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याकरीता कुणबी जातीच्या नोंदीच्या कागदपत्रे आवश्यक आहे. परंतू परभणी जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासणीचे कामे व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच आतापर्यंत ज्या सापडलेल्या कुणबी नोंदी आहेत त्या अत्यंत कमी आहे. याकरीता जिल्हा विभाजनामुळे परभणी जिल्ह्यातील जे तालूके हिंगोली किंवा जालना जिल्ह्यात समाविष्ठ झाली आहेत त्याठिकाणची सन 1967 पुर्वीची सर्व कागदपत्रे तपासावीत. 


अन्यथा संबंधीतास कारवाईला सामोरे जावे लागेल 


परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदी असण्याची शक्यता आहे. याकरीता नोंदीची फेरतपासणी करावी. प्रत्येक संबंधीत विभागाने त्यांच्या कार्यालयात उपलब्ध नोंदीचे प्रत्येक पान पुन्हा काळजीपूर्वक तपासावे. तसेच संबंधीतांनी 100 टक्के नोंदीची तपासणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावीत. या कामात दिरंगाई किंवा दूर्लक्ष केल्यास किंवा शोधणार नसाल तर विभागीय आयुक्त कार्यालयाचे पथक पाठवून तपासणी केली जाईल. आणि त्यानंतर ही त्यात नोंदी आढळल्यास संबंधीतास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा सूचना ही विभागीय आयुक्त आर्दड बैठकीत दिल्या.


आतापर्यंत सापडलेल्या नोंदी...



  • परभणी, सेलु जिंतूर, गंगाखेड, पुर्णा, पालम, पाथरी, मानवत आणि सोपपेठ या 9 तालूक्यात कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. 

  • या 9 तालूक्यात एकुण 2 हजार 288 नोंदी आढळून आल्या आहे.

  • परभणी तालुक्यात 206 नोंदी सापडलेल्या आहेत. 

  • सेलू तालुक्यात 361 नोंदी सापडलेल्या आहेत.

  • जिंतुर तालुक्यात 598 नोंदी सापडलेल्या आहेत.

  • गंगाखेड तालूक्यात 56 नोंदी सापडलेल्या आहेत.

  • पुर्णा तालूक्यात 176 नोंदी सापडलेल्या आहेत.

  • पालम तालूक्यात 181 नोंदी सापडलेल्या आहेत.

  • पाथरी तालूक्यात 608 नोंदी सापडलेल्या आहेत.

  • मानवत तालूक्यात 586 नोंदी सापडलेल्या आहेत.

  • सोनपेठ तालूक्यात 116 नोंदी सापडलेल्या आहेत.


लाभार्थ्यांना मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरण 


जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरवारी मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र विषयक विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. बैठकीस यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जिवराज डापकर, शैलेश लाहोटी, जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख वसंत निकम, जिपचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सिकर यांच्यासह सर्व तहसिलदार आणि विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.


इतर महत्वाच्या बातम्या: 


तुमचं कल्याण झालंय, आमचं हाडूक गुतलंय, मनोज जरांगेंची थेट फोनाफोनी, बच्चू कडू म्हणाले तोंडावर पाडताय का?