जालना : मराठवाड्यात (Marathwada) सापडलेल्या नोंदीबाबत दोन दिवस विशेष शिबीर आयोजित करून ग्रामपंचायत पातळीवर यादी लावणार असल्याचे शब्द बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना दिला होता. मात्र, प्रत्यक्षात जालना (Jalna) जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी अजूनही ग्रामपंचायत पातळीवर प्रशासनाकडून कोणतेही हालचाली होतांना दिसत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला. विशेष म्हणजे जरांगे यांच्या भेटीला आलेल्या बच्चू कडू यांच्यासोमरच त्यांनी थेट वेगवेगळ्या गावात फोन लावला आणि स्पीकर फोनवर बातचीत करून गावात अजूनही प्रमाणपत्र देण्यात येत नसल्याचे सिद्ध करून दाखवले. त्यामुळे बच्चू कडू यांचा पार चढला आणि त्यांनी तहसीलदाराला जागेवरच झापून काढले. 


जरांगे यांच्या आरोपानंतर संतापलेल्या बच्चू कडू यांनी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना थेट फोन लावला. कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांची यादी ग्रामपंचायतवर का लावण्यात आली नाही असा प्रश्न विचारला. तुमचे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार काय करत आहेत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा. आम्हाला येथे पाठवून तोंडावर पाडतात का? असे म्हणत बच्चू कडू यांनी आपला संताप व्यक्त केला. फक्त आदेश काढून देतात आणि खाली काहीच हालचाली होत नाही. असे आपल्याला जमणार नाही. यात ज्यांची चुकी आहे त्यांच्यावर कारवाई करा असे बच्चू कडू म्हणाले. 


मनोज जरांगेंकडून जागेवरच पोलखोल...


काही वेळापूर्वी सरकारचं शिष्टमंडळ आणि बच्चू कडू यांनी आंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट घेतली. यावेळी गावागावात कुणबी नोंदींची यादी लावण्यात येत असून, विशेष शिबीर आयोजित करण्यात येत असल्याचे बच्चू कडू म्हणाले. मात्र, मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या दाव्याची जागेवरच पोलखोल केली. नोंदी सापडलेल्या गावात जरांगे यांनी थेट फोन लावला, स्पीकर फोनवर बातचीत करत गावात यादी लावण्यात आली का? असे विचारले. त्यावर गावकऱ्यांनी अजूनही अशी कोणतेही प्रक्रिया सुरु झाली नसल्याच उत्तर दिले. जरांगे यांनी अशाप्रकारे अनेक गावात फोन लावले आणि प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केली. त्यामुळे बच्चू कडू तोंडावर पडले आणि त्यांनी जागेवरच अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना झापून काढले. 


मुंबईला जाणारच...


दरम्यान, यावेळी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी मुंबई आंदोलनावर ठाम असल्याचे म्हटले आहेत. सरकारने 54 लाख नोंदी सापडल्याचे सांगितले असून, तेवढे प्रमाणपत्र मात्र दिले नाहीत. त्यामुळे 20 जानेवारीच्या आतमध्ये हे प्रमाणपत्र दिले पाहिजे असे जरांगे म्हणाले आहेत. तसेच, 20 जानेवारीला आपण मुंबईकडे निघणारच आणि आपण आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. मराठा काय आहे हे 26 जानेवारीला समजेल असेही जरांगे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठवाड्यात 32 हजार कुणबी नोंदीपैकी 18 हजार प्रमाणपत्र वाटप; विशेष मोहीम राबवणार