परभणी: मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आणि विदर्भात आज सकाळपासूनच पावसाने दाणादाण उडवून दिल्याचं पाहायला मिळालं. बुलडाणा, हिंगोली, परभणी आणि वाशिम जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून परभणीतही शेकडो हेक्टर शेती पाण्यासाठी गेल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. वाशिम शहरातील शेलूबाजार येथील कारंजा रोडवर असलेल्या सेंट्रल बँक, स्टेट बँक एटीएम सुविधांसह काही  ग्रामपंचायतच्या गाळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले. या कॉम्प्लेक्समधील खालच्या माळ्यात असलेल्या  हार्डवेअर, इलेक्ट्रिकल दुकानं आणि हॉटेल लाईनमध्येही पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान झाल्याने आता प्रशासनाने आमच्या शेती व दुकानांची पाहणी करुन पंचनामा करावा, अशी मागणी केली जात आहे. 


मराठवाड्यातील (Marathwada) तीन जिल्ह्यांना आज पावसाने चांगलंच झोडपलं असून मुसळधार पावसामुळे (Rain) परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अकोली नदीला पूर (Flood) आला आहे. या पुरात जवळपास 100 हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या शेत पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिंतूर तालुक्यातील अकोली,भोसी,वरुड(नृ), बलसा, मालेगाव, पाचलेगाव, दगडचोप, चारठाणा,निरवाडी, अंबरवाडी,अंगलगाव, सोन्ना, आडगाव, बेलखेडा, पिंप्राळा या गावांमध्ये नदीपात्र फुटुन शेत पिकांचे‌ आतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन,कापूस, हळदीसह इतर खरीप पिकांचेदेखील मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.


हिंगोलीत 5 जणांना केलं रेस्कू


हिंगोलीतही आज जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळालं. शेतातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती होती. हिंगोलीच्या सावरखेडा गावामध्येसुद्धा अनेक ठिकाणी पूर आला असून येथील एका शेतात पाच जण अडकले होते. त्या पाच जणांना प्रशासनाच्यामदतीने बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आले. त्यासाठी जिल्हा पोलीस दल आणि महसूल प्रशासनाच्यावतीने संयुक्तपणे या पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे.


सिद्धेश्वर धरण 95 टक्के भरलं


हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून जिल्ह्यातील प्रमुख असलेलं सिद्धेश्वर धरण 95 टक्के क्षमतेने भरले आहे. उन्हाळ्यामध्ये या धरणाने तळ गाठला होता, धरणामध्ये फक्त मृत पाणीसाठा शिल्लक होता असे असताना या पावसाळ्यामध्ये शेतकरी सिद्धेश्वर धरण कधी भरतं याचीच वाट पाहत होते. मात्र, रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने सिद्धेश्वर धरण 95% क्षमतेने भरलेलं आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्यावतीने आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सिद्धेश्वर धरणाचे सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात आला आहे. सिद्धेश्वर धरणातून 4935 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय, हे धरण भरल्यामुळे हिंगोली वसमत शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर या धरणावर अवलंबून असलेली शेकडो हेक्टर शेत जमिनीच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे.


अकोल्यात काटेपूर्णा धरण ओव्हरफ्लो


अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाचे आज चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रांमध्येमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या काटेपूर्णा धरण हे 96.06 टक्के भरले असल्याने 30 सेंटीमीरनं 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 100.32 घ.मी. प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग सुरु असून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तर पाण्याची आवक पाहता रात्रभरात अजून दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.


हेही वाचा


रेल्वेत वृद्धास मारहाण करणाऱ्या युवकांना लगेच जामीन, संतप्त आव्हाड पोहोचले पोलीस ठाण्यात