Parbhani Child Marriage : परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे ( Child Marriage ) सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वीच गंगाखेड तालुक्यात एकाच दिवशी चार बालविवाह रोखल्यानंतर आज धक्कादायक घटना समोर आली आहे. 40 वर्षाच्या व्यक्तीबरोबर केवळ साडे तेरा वर्षीच्या बालिकेचा विवाह लावण्यात आलाय. या प्रकरणी परभणीच्या पाथरीतील 13 जणांवर गुन्हा दाखल झाला असून यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे. तर पाच आरोपी अद्याप फरार आहेत. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी स्वत: पोलिस ठाण्यात बसून या 13 जणांवर गुन्हा दाखल करून घेतला आहे. 
 
परभणीच्या पाथरी शहरातील आदर्श नगर येथे 2 डिसेंबर 2022 रोजी एक बालविवाह झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. या माहिती वरून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून सविस्तर माहिती घेतली आणि कारवाई केली. पाथरीतील आदर्श नगरमध्ये अवघ्या साडे तेरा वर्षाच्या मुलीचा विवाह चाळीस वर्षाच्या व्यक्तीबरोबर लावण्यात आला होता. यात काही आर्थिक व्यवहार देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे मुलगी अल्पवयीन असताना देखील तिला सज्ञान दाखवण्यासाठी काही बनावट दस्तावेज तयार करण्यात आले होते. पोलिसांनी हे बनावट दस्तावेज जप्त केले आहेत. बालविकास प्रकल्प अधिकारी रुपाली रंगारी यांच्या फिर्यादीवरून मुलीचा पती, सासू, मुलीचे आई- वडील यांच्यासह इतर 9 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


Parbhani Child Marriage :  परभणीत बालविवाहाचे प्रमाण वाढले


दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण खूपच वाढले आहे. मागच्या सहा दिवसात जिल्ह्यात नऊ बालविवाह रोखले गेले आहेत. बालविवाहमुक्त परभणी अभियाना अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 


परभणी जिल्हा बालविवाह लावण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बालविवाह मुक्त परभणी हे अभिमान सुरू केले असून या अभियानांतर्गत चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून बालविवाहाबाबत माहिती मिळाली की तात्काळ कारवाई केली जात आहे. मागच्या सहा दिवसांपूर्वी जिंतूर आणि सोनपेठमध्ये एकाच दिवशी पाच ठिकाणी लावण्यात येणारे बालविवाह या पथकाने रोखले होते. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा हा प्रकार गंगाखेड तालुक्यात होत होता. चार ठिकाणी होणारे बालविवाह यावेळी या पथकाने रोखले असून यातील अल्पवयीन वधू वरांसह त्यांच्या पालकांना बालकल्याण समिती समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सत्र सुरू असतानाच नुकतीच ही धक्कादायक घटना घडली आहे.  


महत्वाच्या बातम्या


Parbhani Child Marriage : परभणीत बालविवाहाचे सत्र सुरूच, आज पुन्हा एकाच दिवशी चार बालविवाह रोखले