वसई : विरार- एमएमआरडीएच्या सूर्या (403 दशलक्ष लिटर) पाणी पुरवठा योजनेवर आतापर्यंत 1200 कोटी रुपये खर्च झाले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नांतून 50 टक्के निधी (529.93 कोटी) या योजनेवर खर्च झालेला आहे. त्यातून मीरा-भाईंदर व वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठीचे 87 टक्के काम पूर्ण झालेले आहे. तर वसई-विरार महापालिकेला तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या 70 ते 80 दशलक्ष लिटर पाण्यासाठीचे 100 टक्के काम पूर्ण झालेले आहे. मात्र विद्यमान सरकारच्या प्रभावाखाली एमएमआरडीएकडून जाणीवपूर्वक हे पाणी देण्यास विलंब केला जात असल्याची वसई-विरारकरांची भावना आहे. त्यामुळेच वसईकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 11 सप्टेंबर रोजी एमएमआरडीए मुंबई-वांद्रे कार्यालयावर धडकणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे.
सूर्या (403 दशलक्ष लिटर) पाणी पुरवठा योजनेतून वसई-विरार महापालिकेला मिळणाऱ्या 185 दशलक्ष लिटर पाण्यापैकी 70 ते 80 दशलक्ष लिटर पाणी जून 2023 अखेर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महापालिकेसोबतच्या 21 जून 2023च्या बैठकीत दिले होते. मात्र एमएमआरडीच्या दिरंगाईमुळेच हे पाणी उपलब्ध होत नसल्याने वसई-विरारकरांनी संताप व्यक्त केलेला आहे.
उपलब्ध पाणी शहरात आणण्याच्या दृष्टीने महापालिकेमार्फत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम पूर्ण करून उच्च दाब चाचणी घेण्यास एमएमआरडीएने कळविले होते. त्यानंतर काशिद-कोपर येथील संतुलन टाकीतून पाणी उपलब्ध करून नवीन अंथरण्यात आलेल्या जलवाहिनीचे निर्जंतुकीकरण आणि जलवाहिनी स्वच्छ करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देशही एमएमआरडीएने दिले होते. त्यानुसार वसई-विरार महापालिकेने 31 जुलै 2023 रोजी जलदाब चाचणी तसेच जलवाहिनीचे निर्जंतुकीकरण आणि जलवाहिनी स्वच्छ करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र सप्टेंबरअखेर आला तरी एमएमआरडीएकडून ही आश्वासनपूर्ती झालेली नाही. परिणामी शहरातील 24 लाख लोकसंख्येला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख पंकज देशमुख यांनी केला आहे.
एमएमआरडीएच्या सूर्या (403 दशलक्ष लिटर) पाणी पुरवठा योजनेतून मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राला पाणी देण्याकरता जलवाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेतून वसई-विरार महापालिका क्षेत्राला 185 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. तर उर्वरित 218 दशलक्ष लिटर पाणी हे मीरा-भाईंदर महापालिकेला प्राप्त होणार आहे. 1329.01 कोटींची ही योजना असून 3 ऑगस्ट 2017 रोजी या कामासाठीचे कार्यादेश निघालेले होते. मात्र काही कारणास्तव ही योजना रेंगाळल्याने या कामासाठी आता मे 2024 पर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे.
एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी काय म्हटले?
या वर्षी अतिरिक्त पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्यात गढूळपणा आहे. त्यामुळेच पाणी देण्यास विलंब लागत आहे. पाणी शुद्ध करताना वॉटर ट्रिटमेंट प्लांटवर ताण येत आहे. पाऊस कमी झाला, पाण्यातील गढूळपणा कमी झाला की, वसई-विरारकरता तात्काळ पाणी उपलब्ध करून देता येईल, अशी माहिती एमएमआरडीएचे उपअभियंता आकाश कदम यांनी दिली.
वसई-विरार महापालिकेने काय म्हटले?
वसई-विरार महापालिकेने 4 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै असा सातत्याने एमएमआरडीए प्रशासनासोबत पत्रव्यवहार केलेला आहे. पालिकेला उपलब्ध होणारे 70 ते 80 दशलक्ष लिटर पाणी वितरित करण्यासाठीची कार्यवाही एमएमआरडीए प्रशासनाच्या निर्देशांनुसार पूर्ण करण्यात आलेली आहे, असे या पत्रांतून कळविण्यात आलेले होते. एमएमआरडीएने पाणी उपलब्ध करून दिल्यास महापालिका मासवण येथील वॉटर ट्रिटमेंट प्लांटमधून (200 एमएलडी) हे पाणी शुद्ध करून घेऊ शकेल, असे वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी म्हटले.