पालघर : वसईतील (Vasai) रास्तभाव दुकानांमध्ये होणाऱ्या धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश झाल्यानंतर महसूल प्रशासनाने कारवाई करत 5 शिधावाटप दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. तसेच, संबंधित दुकानचालकांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हे ही दाखल करण्यात आले आहेत. भारतीय खाद्य निगम (FCI) मार्फत पुरवले जाणारे स्वस्त धान्य शिधावाटप (Ration card) केंद्रात पोहोचवण्याऐवजी थेट खासगी बाजारात विकले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. तसेच, काही दुकानदारांनी चलन नसतानाही धान्याच्या गोण्या अन्यत्र उतरवल्याचे निष्पन्न झाले. याबाबत, या भागातील सामाजिक कार्यकर्त्यां आशा पाटील यांनी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करत रंगेहात हा घोटाळा उघडकीस आणला होता. त्यानंतर, पुरवठा विभागाने कारवाई करत 5 दुकानांचे परवान रद्द केले आहेत.
राज्यातील अनेक जिल्ह्यात अशाप्रकारे स्वस्त धान्य दुकानातील माल खासगी बाजारात विकण्याचा घाट घातला जातो. यामध्ये, अनेकदा स्थानिक पुरवठा अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जातो. त्यामुळे, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी खोलवर जाऊन तपास केल्यास अशी प्रकरणे उघडकीस येतात. आता, वसई येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी कारवाई केल्यानंतर 5 दुकानांवर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
या प्रकरणात जगदंबा महिला बचत गट, जितेंद्र चव्हाण, श्रमिक महिला बचत गट, आदिशक्ती महिला बचत गट यांच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी पोपट ओमासे यांच्या चौकशीत गैरप्रकार सिद्ध झाल्याने आनंद जैस्वाल (उमराळे), श्रमिक महिला बचत गट (माणिकपूर), महालक्ष्मी महिला बचत गट (माणिकपूर), आदिशक्ती महिला बचत गट (माणिकपूर), सरस्वती महिला बचत गट (माणिकपूर) या दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या आशा पाटील यांनी दिली.
तात्पुरत्या स्वरुपात नजीकच्या दुकानांना जोडणार
दरम्यान, रद्द करण्यात आलेली रास्तभाव दुकाने तात्पुरत्या स्वरूपात नजीकच्या शिधावाटप केंद्रांना जोडण्यात येणार आहेत. वसईत एकूण 180 शिधावाटप केंद्रे आहेत. या प्रकरणामुळे इतर दुकानांचीही चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?