विरार : मुंडकं कापून धड गोणीत भरून, नाल्यात फेकलेला महिलेचा मृतदेह शोधण्यात मांडवी पोलिसांना (Police) आज यश आले आहे. होळीच्या दिवशी या महिलेचं मुंडकं एका सुटकेसमध्ये आढळून आलं होतं. विरार (Virar) फाट्याकडे जाणाऱ्या पिरकुंडा दर्ग्याजवळ ही सुटकेस पोलिसांना सापडली होती. याबाबत मांडवी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार, पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत होता. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आलं आणि मुंडकं असलेल्या महिलेच्या पतीलाच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची राहत्या घरात गळा दाबून हत्या करून, तो मृतदेह विरारच्या देशमुख फार्म हाऊसजवळ आणून मुंडक कापून धड वेगळे केलं होतं. मुंडक नसलेलं धड एका गोणीत भरून मोठ्या नाल्यात फेकून आरोपी पती फरार झाला होता. होळीच्या दिवशी मुंडक मिळाल्यानंतर 24 तासात आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली होती. विरार पूर्व विरार नालासोपारा लिंक रोडजवळील देशमुख फार्म हाऊस जवळील नाल्यात आज सकाळी मुंडक नसलेल्या मृतदेहाचे सर्च ऑपरेशन राबवून त्याचा शोध घेण्यात पोलिसांनी यश मिळविले आहे.
होळी दिवशी घटना, पोलीस तपास वेगाने
विरारमध्ये 13 मार्च म्हणजेच होळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. विरार फाट्याजवळील पिरकुंडा दर्ग्याजवळ एका ओसाड ठिकाणी एका सुटकेसमध्ये महिलेचे मुंडके आढळले. स्थानिक मुलांनी ही सुटकेस उघडल्यानंवर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामाही करण्यात आला. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली. मात्र, तिच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत हे स्पष्ट झालेलं नव्हतं. मात्र, विरार पोलिसांनी घटनेचा उलगडा करण्याच्या दृष्टीने तपास सुरू केला होता. कलिना येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी अधिकचा तपास केला. मांडवी पोलिसांकडून हत्येचा तपास करत अखेर आरोपी पतीला बेड्या ठोकण्यात आल्या. तर, महिलेचे कापलेलं शरीरीही शोधून काढलं.