पालघर : फिलिपाईन्सला (Philippines) फिरायला गेलेल्या वसईतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. एका ट्रकने ओव्हरटेर करताना त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. जेराल्ड परेरा (50) आणि प्रिया परेरा (46) या या दांपत्याचं नाव असून ते वसईच्या सांडोर गावातील आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे सांडोर गावासह वसई परिसरात शोककळा पसरली आहे.
Vasai Couple Accident In Philippines : फिरायला गेले अन् अपघात झाला
मे महिन्याची सुट्टी असल्याने जेराल्ड आणि प्रिया फिलिपाईन्समधील सेबू येथे सहलीसाठी गेले होते. स्थानिक ठिकाणे फिरण्यासाठी त्यांनी दुचाकी भाड्याने घेतली होती. शनिवारी सकाळी बाडियान परिसरात दुचाकीवरून जात असताना एका फिलिपिनो ट्रक चालकाने ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी सिमेंटच्या विद्युत खांबाला आदळली.
या अपघातात प्रिया परेरा यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या जेराल्ड परेरा यांना तात्काळ मांडौ शहरातील चोंग हुआ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी उपचारादरम्यान त्यांचेही निधन झाले. या अपघाताची नोंद बाडियान पोलिस ठाण्यात झाली असून संबंधित ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
Vasai Couple Killed In Road Accident : जखमी अवस्थेत वसई चर्चच्या फादरना फोन
सर्वाधिक भावनिक बाब म्हणजे, अपघातात गंभीर जखमी असूनही जेराल्ड परेरा यांनी वसई माणिकपूर चर्चचे धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. फादर रुमाव यांनी ही माहिती तात्काळ परेरा कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवली. अन्यथा त्यांच्या अपघाताची बातमी उशिरा समजली असती, असे फादर रुमाव यांनी सांगितले.
जेराल्ड आणि प्रिया परेरा यांना तनिश (20) आणि त्रिशा (17) अशी दोन अपत्यं आहेत. परेरा दांपत्याच्या मृतदेहांना वसईत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यांच्या नातेवाईकांनी फिलिपाईन्समध्ये धाव घेतली आहे.
या अपघातामुळे वसईतील विविध समाजघटकांतून हळहळ व्यक्त केली जात असून परेरा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ही बातमी वाचा: