Maharashtra Weather : महाराष्ट्रातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. राज्यातील काही भागात सध्या उन्हाचा जोरदार तडाखा जाणवत आहे, तर काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, रायगड (Raigad) जिल्ह्यासाठी पुढील 3 ते 4 तास महत्वाचे आहेत. कारण या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागानं रायगड जिल्ह्याला आज यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस कोळसणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिला आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नाही. दरम्यान, अरबी समुद्रात दिड किमी उंचीपर्यंत घड्याळ काटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी 45 ते 50 किमी वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
धुळे शहरासह परिसरात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एकीकडे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तयारीला वेग दिलेला असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहेत या अवकाळी पावसामुळे हरभरा मका गहू या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. तसेच यंदा शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर देखील लागवड केली होती. मात्र या अवकाळी पावसामुळे हा कांदा सडून जाण्याची देखील भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून यामुळे वातावरणात एकीकडे बदल झालेला असला तरी दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला वादळी वारा आणि पावसाचा जोरदार तडाखा
दरम्यान, पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला वादळी वारा आणि पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वारा आणि पावसाचा मच्छीमारांना देखील फटका बसला आहे. डहाणू आणि पालघरमधील चाळीस ते पंचेचाळीस बोटींच मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. वादळाच्या तडाख्यात 40 ते 45 बोटी सापडल्या होत्या, त्यांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे सुरु करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: