Palghar Twin Babies Died : पालघरमध्ये सोयीसुविधांच्या अभावामुळे दोन जुळ्या बालकांचा मृत्यू झाला. ही बातमी 'एबीपी माझा'नं दाखवत परिस्थितीची गंभीरता सर्वांसमोर आणली. यानंतर आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी या घटनेची दखल घेतली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'एबीपी माझामुळे खूप दुर्दैवी बातमी पाहिली पालघर मोखाडा या आदिवासी भागात एका माऊलीला जुळ्या मुलांना जीव गमवावा लागला कारण गावात रस्ता नाही. गरिबांच्या गरजा आणि जिवाची लढाई आजही कठीण आहे. अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या या भागात विकासरूपी पोषण अजुनही नाही याचं दुःख आणि दुर्दैवी वाटलं.'
एकीकडे देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात मूलभूत सोयीसुविधा पोहोचलेल्याच नसल्याचं चित्र आहे. गर्भवतीला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बालकांचा (Twins) मृत्यू झाला. पालघर (Palghar) जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी इथे ही हृदयद्रावक घटना घडली.
या गावात रस्ता नसल्याने वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला. परंतु आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिला तिच्या जुळ्या बालकांचा मृत्यू डोळ्यादेखत पाहावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली. या गावातील ही दुसरी घटना आहे. रस्ता नसल्याने दोन-तीन महिलांना डोलीतून दवाखान्यात नेण्याची वेळ आली होती. मोखाडा तालुक्यात अशी अनेक गावं आहेत ज्यात सुविधा नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
पाहा व्हिडीओ : पंकजा मुंडेंकडून 'एबीपी माझा'च्या बातमीची दखल
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मूलभूत सुविधांची वानवा
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या सारख्या प्राथमिक सुविधा आदिवासींना मिळालेल्या नाहीत. आजही येथील आदिवासींना रस्त्याअभावी डोलीकरुन पायपीट करत दवाखान्यात जावं लागत आहे. तर वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने प्राण गमवावे लागत आहेत.
गरोदरपणात या भागातील महिला नातेवाईकांकडे जातात
दरम्यान जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यातील गरोदर महिलांना प्रसुतीची वेळ, तारीख जवळ आली की तालुक्याच्या ठिकाणी, त्यांच्या नातेवाईकांकडे येऊन थांबावं लागतं.