पालघर : राज्यातील अनेक जिल्ह्यात, शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांचा (Dog) मोठ्या प्रमाणात वावर असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाला कळवण्यातही येतं. मात्र, प्रशासनाकडून लवकरात लवकर कार्यवाही केली जात नसल्याने नाहक त्रास सहन करावा लगातो. या मोकाट कुत्र्यांपासून सर्वसामान्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचंही अनेकदा पाहण्यात आलं आहे. आता,  बोईसर (Palghar) परिसरात भटक्या श्वानांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. गुरुवारी बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना पिसाळलेल्या श्वानानी चावा घेतला आहे. या सर्वांना बोईसर ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


पालघर जिल्ह्यातील नागरी, किनारपट्टी आणि ग्रामीण भागातील गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गुरुवारी बोईसर मधील ओस्तवाल, बाजारपेठ आणि नवापूर नाका परीसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने प्रचंड हैदोस घातला. शाळेतून पायी घरी परतणारे विद्यार्थी आणि नागरीक अशा जवळपास 12 ते 15 जणांना या कुत्र्याने दंश केला. बोईसरच्या इतर भागातील नागरिकांना देखील श्वान दंश झाल्याच्या घटना घडल्या असून गुरुवारी दिवसभरात तब्बल 26 जणांना बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज शिंदे यांनी दिली. सामान्य दंश केलेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार आणि अँटी रेबीज लस देऊन घरी सोडण्यात आले तर तीव्र स्वरूपाची जखम झालेल्या रुग्णांना इमूनोग्लोबोनील लस देण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भटक्या श्वानांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण असून रात्रीच्या सुमारास निर्जनस्थळी, रस्त्यांवर संचार करण्यास नागरीकाना भीती वाटू लागली आहे.


निर्बिजीकरण मोहीम बंद


पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी लगत असलेल्या दांडी आणि पास्थळ ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषदेच्या पशू संवर्धन विभागामार्फत भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.यामध्ये जवळपास 1500 श्वानांचे निर्बीजीकरण पूर्ण करण्यात आले ,मात्र त्यानंतर निधीअभावी ही मोहीम बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा


''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला 


अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार