पालघर : बोईसरचे माजी आमदार विलास तरे तसेच पालघरचे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांनी आज मुंबईत भाजपमध्ये (Mumbai BJP) प्रवेश घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे त्यांनी भाजपा प्रवेश घेतला. त्यामुळे शिवसेनेबरोबरच शिंदे गटालाही मोठा धक्का दिला आहे.


शिवसेनेतून जिल्हा परिषद सदस्यत्व उपभोगलेल्या विलास तरे यांनी बहुजन विकास आघाडी मधून सन 2009 आणि 2014 मध्ये बोईसर मतदार संघातून आमदारकी उपभोगली होती. त्यानंतर शिवसेनेतून 2019 विधानसभा निवडणूक लढवताना त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेमधून निवडणूक लढवताना त्यांना अंतर्गत विरोध झाला होता. ते शिवसेनेत अस्वस्थ होते.


राष्ट्रवादीमधून पक्षांतर करून शिवसेनेत गेलेल्या कृष्णा घोडा यांचे 24 मे 2015 रोजी निधन झाल्यानंतर फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव अमित घोडा विजयी झाले होते. मात्र शिवसेनेने सन 2019 मध्ये त्यांना तिकीट नाकारून त्यांच्या ऐवजी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती. अमित घोडा यांची पत्नी अमिता घोडा जिल्हा परिषद सदस्य असून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी त्या इच्छुक होत्या. अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केला होता.


शिवसेनेतील दबावामुळे ते शिवसेनेत कायम राहिले होते. आपल्या भागातील विकास कामे होत नसल्याने तसेच आपल्याला पक्ष संघटनेने विश्वासात घेतले नसल्याने आपण पक्षांतर केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पालघर जिल्ह्यात या माजी दोन आमदारांनी भाजपा प्रवेश केल्याने शिवसेनेबरोबरच शिंदे गटालाही मोठा धक्का दिला आहे.