Palghar Crime : 'माता न तू वैरिणी' या म्हणीचा प्रत्यय पालघर (Palghar) जिल्ह्यात आला. जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील जव्हार इथे उघडकीस आली आहे. अफसाना उर्फ तारा सुलेमानी असं या निर्दयी आईचं नाव आहे. तिने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीची हत्या केली. अफसाना ही मागील दोन वर्षांपासून पतीपासून वेगळं राहून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करत होती. जव्हार पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतला आहे. 


पालघर जिल्ह्यातील जव्हार इथल्या साना सुलेमान या तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह तिच्याच घरा शेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीत कोंबलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तपासानंतर सानाची आई अफसाना उर्फ तारा सुलेमानी हिनेच तिचा खून केल्याचं समोर आलं. यानंतर जव्हार पोलिसांनी भादंवि कलम 302 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतलं आहे.


सानाची आई इतरांच्या घरात घरकाम करत असून आपल्या तीन मुलांसह पतीपासून विभक्त होऊन मागील दोन वर्षापासून या ठिकाणी राहत होती . मात्र तिची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्या घरात नेहमीच पैशांवरुन वाद होत होते. याच आर्थिक चणचणीला कंटाळून आरोपी आईने तीन वर्षीय चिमुकल्या सानाची हत्या केल्याचा अंदाज पालघर पोलिसांना आहे. या प्रकरणात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी आईची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र हत्येचं खरं कारण काय होतं हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.


आरोपी महिलेला एकूण तीन अपत्ये आहेत. ज्यात दोन मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. या महिलेला 14 आणि 12 वर्षांची दोन मुले आहेत तर तीन वर्षांच्या चिमुकलीची तिने हत्या केली. प्राथमिक तपासानुसार या महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिची मानसिक स्थिती चांगली नव्हती. त्यातूनच तिने मुलीची हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


तुळजापुरात पित्यानेच झाडली पोटच्या मुलीवर गोळी
जेवणासाठी केलेल्या मटणावर कुत्र्यानेच ताव मारल्याने झालेल्या वादात एका वडिलाने आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेतल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील कार्ला इथे घडली. आरोपी पित्याने गोळी झाडून विवाहित मुलीची हत्या केली. हत्येच्या वेळी आरोपी नशेत असल्याचे म्हटलं जात आहे. आरोपी वडील फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. ही दुर्देवी घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. वीस वर्षीय मृत काजल शिंदे ही तिच्या माहेरी पतीसह राहत होती. रविवारी जेवणासाठी घरात मटण आणून काजलने रस्सा केला होता. मटणाचा रस्सा झाल्यानंतर ती घरात इतर कामे करत होती. त्याच वेळी एका कुत्र्याने जेवणासाठी तयार केलेले हे मटण खाल्ले. हा प्रकार काजलची आई मीराने पाहिल्यानंतर तिने याचा जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यातून दोघींमध्ये मोठी वादावादी झाली. या दरम्यान दारुच्या नशेत असलेले काजलचे वडील गणेश भोसले यांनी खुंटीवर टांगून ठेवलेल्या गावठी बंदुकीतून काजलवर गोळी झाली, ज्यात तिचा मृत्यू झाला.