पालघर : शाळा म्हणजे ज्ञानमंदिर. शाळा (School) ही प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे. दर्जेदार शिक्षणामुळे दर्जेदार विद्यार्थी घडतात. आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन घडवून खऱ्या अर्थाने राष्ट्र घडवतात. परंतु पालघरमधील (Palghar) प्रकार या सगळ्याला हरताळ फासणार आहे. तलासरी तालुक्यातील सूत्रकार डोंगरपाडा या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या (Student) हाती पुस्तकांऐवजी जुगाराचे (Gambling) पत्ते असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकाने रोजंदारीवर एका निवृत्त शिक्षकाला ठेवल्याचाही प्रकार घडला आहे. 


स्वत: शाळेत न जाता मजुरीवर निवृत्ती शिक्षकाला ठेवलं


वर्गातच विद्यार्थी चक्क पत्ते खेळत असल्याचे फोटो समोर आले आहेत. इतकंच नव्हे तर या शाळेतील मूळ शिक्षकांनी मजुरीवर शिक्षक नेमल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा झालेला पाहायला मिळत आहे. शाळेत मुलांना शिकवायला शासनाचा गलेलठ्ठ पगार घ्यायचा पण शाळेत न जाता मुलांना शिकवायला मजुरीवर शिक्षक ठेवायचा, असा प्रकार तलासरी तालुक्यात उघड झाला आहे. 


शिक्षणाची पुस्तके सोडून वर्गातच पत्त्यांचा डाव




तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सूत्रकार डोंगरपाडा ही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा. या शाळेत केवळ एक शिक्षक आणि चौदा मुले शिक्षण घेतात. तरी सुद्धा या मुलांना शिकवायचा कंटाळा येत असल्याने गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकाने स्वतः घरी बसून 300 रुपये रोजदारीवर एका निवृत्त शिक्षकाला मुलांना शिकवायला ठेवले आहे. पण निवृत्त शिक्षकही काय करणार तोही शाळा राखत निवांत बसून असल्याने मुलेही शिक्षणाची पुस्तके सोडून वर्गातच पत्ते घेऊन जुगाराचा डाव मांडतात.


पाहणीत काय समोर आलं?


नागरिकांच्या तक्रारीवरुन सूत्रकार डोंगरपाडा येथील शाळेवर बुधवारी (27 सप्टेंबर) दुपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेत प्रमुख शिक्षक रवी कुमार सुभाष फेरे उपस्थित नसून ते गणपतीसाठी गावी गेल्याचे समजले. तसेच गावी जाताना मुलांना शिकवण्यासाठी 300 रुपये रोजंदारीवर रामा लोतडा या निवृत्त शिक्षकाला ठेवलेले दिसून आले.


हेही वाचा


Kolhapur News : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, कारवाईच्या भीतीने दोन तरुणांनी इमारतीवरुन उडी मारली, एकाचा जागीच मृत्यू