पालघर : गाडीच्या हॉर्नचा आवाज आणि अप्पर डिप्परची लाईट या दोन गोष्टींवरुन वसईतील ज्वेलर्स दरोड्याचा छडा माणिकपूर आणि वालीव गुन्हे शाखेच्या टीमने लावला आहे. यात जवळपास हजाराहून अधिक सीसीटीव्ही तपासण्यात आले होते. मात्र चोरी केल्यानंतर गाडी सीसीटीव्हीत दिसत नव्हती. एका सीसीटीव्हीत एका घरासमोर अचानाक दोन वेळा हॉर्न वाजवण्यात आला आणि अप्पर डिप्पर लाईट दाखवली गेली. या संशयावरुन दरोड्याचा उलगडा पोलिसांना करता आला. या गुन्ह्याच्या तपासात माणिकपूर आणि वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमला पोलिस आयुक्तांनी प्रशस्तीपत्रही दिलं. 


हजारांहून अधिक सीसीटीव्ही तपासले


माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ज्वेलर्सच्या दुकानावर 20 जानेवारी रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. दरोड्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. मात्र आरोपींनी चेहरा झाकला असल्याने चोरांची ओळख पटली नव्हती. चोरीनंतर दोन आरोपी कोणत्या दिशेने पळाले हे पाहण्यासाठी माणिकपूर आणि वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने जवळपास हजाराहून अधिक सीसीटीव्ही तपासले. मात्र त्या बाईकचा कोणताही पत्ता लागत नव्हता. 


हॉर्न आणि लाईटमुळे आरोपी सापडला


या सगळ्याची पुन्हा एकदा तपासणी केल्यावर एका सीसीटीव्हीत एका घरासमोर गाडीची लाईट अप्पर डिप्पर होते आणि दोनदा हॉर्न वाजवला गेल्याच आढळून आलं. पोलिसांना संशय आल्याने ते घर कुणाच आहे त्याचा तपास केला. 56 हून अधिक गुन्ह्यात आरोपी असलेला आणि नुकताच जामीनावर सुटून आलेल्या कुविख्यात आरोपीचे ते घर असल्याच समजलं. त्यानंतर तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवून, त्या घरात राहणारा गुन्ह्याचा मास्टर माईंड, 56 पेक्षा अधिक खून आणि दरोड्याचे गुन्हे दाखल असलेला रॉयल उर्फ एडवर्ड सिक्वेरा आढळून आला. 


पोलिसांनी सिक्वेरा आणि त्याचे साथिदार अनुज चौगुले, लालसिंग उर्फ सिताराम मोरे आणि सौरभ उर्फ पप्पू तुकाराम राक्षे या चौघांना अटक केली. यात एक आरोपी अजून फरार आहे. रॉयल आणि अनुज यांना मकोका लागला आहे.


माणिकपूर पोलिस या गुन्ह्यातही दोन्ही आरोपींना मकोका लावण्याची मागणी करणार आहेत. अत्यंत कुशलतेने तपास केल्यामुळे माणिकपूर आणि वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमला पोलीस आयुक्त मधूकर पांडे यांनी प्रशस्तीपत्र देवून त्यांचा सन्मान केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी 23, 39, 220 किमतीचे 297 ग्रँम वजनाच्या सोन्याच्या लगड, 1 ऑटोमेटिक पिस्तुल, 1 जिवंत काडतूस, कोयता, कटावणी, मोबाईल फोन, एक पल्सर मोटारसायकल इत्यादी साहित्य जप्त केलं.


ही बातमी वाचा: