Palghar News : जिल्हा परिषद शिक्षक म्हटला की 10 ते 5 अशी कामाची वेळ पाळणारे शिक्षक (Teacher) दिसतात, पण पालघरमधील (Palghar) कासपाड्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक (ZP School Teacher) अजित गोणते सर हे त्याहून अगदी वेगळे होते. त्यांच्या बदलीने (Transfer) संपूर्ण गाव भावूक झाला. त्यांना निरोप देताना पालक विद्यार्थी अतिशय भावूक झाले. गेली 14 वर्षे त्यांनी विद्यार्थी सर्वांगीण विकास व गुणवत्ता, क्रीडास्पर्धा व वकृत्व स्पर्धेतील तालुका, जिल्हा पातळीवरील विद्यार्थ्यांचे यश, शाळेच्या भौतिक सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल असे विविध उपक्रम राबवून प्रत्येक पालक आणि ग्रामस्थांच्या मनात घर केलं होतं. अशातच शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रणालीद्वारे अजित सरांची जिल्हाअंतर्गत आणि आंतरजिल्हा अशी दोन्ही ठिकाणी बदली झाली आणि कासपाड्यातील ग्रामस्थांनी भावूक होऊन सरांना निरोप द्यावा लागला.
गावात पोस्टर, 'तारपा'च्या गजरात मिरवणूक
"आमचे आदर्श शिक्षक आमचा अभिमान" असं पोस्टर लावून गावातील माता-भगिनी आरती ओवळत, रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत, पारंपरिक "तारपा" वाद्याच्या गजरात कासपाड्यातून सरांची मिरवणूक काढली. मिरवणुकीत सर्व पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ भावूक होऊन सरांसोबत सरांसाठी रडत होते.
पुण्यात शिक्षण आणि आदिवासी भागात नोकरी
अनेकांना आयुष्यभर नोकरी करुन सेवापूर्तीच्या शेवटच्या दिवशीसुद्धा असे प्रेम मिळत नाही, ते अजित गोणते सरांनी 14 वर्षात त्याच्या वयाच्या ऐन पस्तीशीत मिळवले. लहानापासून पुण्यात (Pune) शिकलेले, ग्रामीण भागाचा आणि त्यांचा काडीचाही संबंध नसलेले अजित सर जेव्हा या आदिवासी ग्रामीण भागात शिक्षक म्हणून नोकरीला लागले, इथले ग्रामीण विद्यार्थी, गाव, गावातील ग्रामस्थ जेव्हा त्यांनी पहिल्यांदा बघितले तेव्हाच त्यांनी ठरवले होते की माझी खरी गरज इथे आहे.
भावूक होत सन्मानपूर्वक ग्रामस्थांचा अजित सरांना निरोप
पुढे त्यांनी कासपाड्यातील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ हेच माझे कुटुंब मानून गावासाठी खूप काही केले. अनेक उपक्रम राबवून त्यांनी गावातील लोकांची मने जिंकली. या अजित सरांच्या प्रेमापोटी, आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती आपल्यातून सोडून चालली आहे म्हणून, जशी एखादी मुलगी लग्न होऊन सासरला जाते आणि तिला आपण आवंढा गिळत, कधी रडत-रडत निरोप देतो तसा सन्मानपूर्वक निरोप कासपाड्यातील ग्रामस्थांनी अजित सरांना दिला.
हेही वाचा