Palghar: शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers Suicide) रोखण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणीआधी प्रति एकरमागे दहा हजार रुपये देण्याचा निकष विभागीय आयुक्तांकडून सरकारला देण्यात आला आहे आणि या निकषावर सरकार देखील सकारात्मक असल्याचं राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सांगितलं. अब्दुल सत्तार बुधवारी (17 मे) पालघर (Palghar) जिल्ह्यातील चिंचणी येथे शेतकरी मेळाव्यात आले असता पत्रकारांशी बोलत होते.


शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 25 पेक्षा अधिक उपायोजना करणार


शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना आणणार असल्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers Suicide) रोखण्यासाठी 25 पेक्षा अधिक उपायोजना करणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं. तर राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील आहे आणि शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या आम्ही करू, असं मत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं.


महामार्गासाठी मोबदला न देताच शेतकऱ्यांना बेघर केल्याच्या घटनेवर कारवाई होणार


राज्यातील सरकार हे बळीराजाचं सरकार आहे, असा पुनरुच्चार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. पालघरमध्ये (Palghar) मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या (Mumbai-Baroda Expressway) ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला न देताच त्यांना बेघर केल्याच्या घटनेवरही सत्तार यांनी बोट ठेवलं. घटनेबाबत संपूर्ण माहिती घेऊ आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे करणार असल्याचं सत्तार यांनी यावेळी सांगितलं.


युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करणार


पालघरमध्ये युरिया खताचा काळाबाजार होत असल्याच्या घटना वारंवार समोर येतात. तर यावर बोलताना, पालघरमध्ये होत असलेला युरियाचा (Urea) काळाबाजार रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यावेळी अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिलं.


विनाकारण बदनामी करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार


लोकशाहीच्या राज्यात कोणीही कोणाच्या हक्कांवर गदा आणत असेल किंवा विनाकारण कोणाला बदनाम करत असेल, तर त्यांच्यावर हक्कभंग आणला जातो आणि त्या पद्धतीची पुढील कार्यवाही विधानसभेचे अध्यक्ष करतात, असं सूचक वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात 50 आमदार हक्कभंग आणणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी हे वक्तव्य केलं आहे.


हेही वाचा:


Shiv Sena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं 'मिशन मुंबई'! मुंबईत नवा उपक्रम...ठाकरेंना धक्का देण्यासाठी रणनीती