पालघर : पालघर (Palghar News) जिल्हा हा विविधतेने नटलेला असून या जिल्ह्यात विविध पद्धतीने शेती केली जाते.  जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भात शेती केली जात असली तरी सुद्धा येथील तरुण सध्या पर्यायी शेतीकडे वळू लागला आहे. डहाणू तालुक्यातील केतखाडी येथील एका ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणाने पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच ऑर्किड (Orchid) या फुलाची फुलशेती करत अनोखा उपक्रम केला आहे.  सध्या या ऑर्किड (Orchid) फुलशेती पासून प्रसाद सावे यांना उत्तम उत्पन्नही मिळतंय . 


 डहाणू तालुक्यातील केतखाडी येथील प्रसाद सावे यांनी शिक्षण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पूर्ण झाले. मात्र उच्चशिक्षित असताना सुद्धा प्रसाद सावे यांनी आपल्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवून फुल शेती करण्याचा निर्णय घेतला. ऑर्किड या फुलाची लागवड पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोणीही केली नसून यात उत्तम नफा असल्याने प्रसादने ऑर्किड फुलशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी गोवा , दिल्ली, कलकत्ता या ठिकाणी जाऊन ऑर्किड फुलशेतीची पाहणी देखील केली. जिल्ह्यात कुठेही ऑर्किड फुलशेती केली गेली नसल्याने यात जोखीम असल्याच लक्षात येऊन ही प्रसादने आपल्या साडेतीन एकर जागेत शेडनेट उभारून ऑर्किड फुलाच्या रोपांची लागवड केली. यासाठी प्रसाद यांनी बँकॉक येथून ऑर्किड या रोपांची आयात केली. 2019 सालापासून प्रसाद यांनी या रोपांची लागवड केली असून त्यांना सध्या या ऑर्किड फुलशेतीतून उत्तम नफा मिळतोय. 


 प्रसाद सावे यांनी आपल्या साडेतीन एकर जागेत शेडनेट उभारत एकरी मागे 40 हजार ऑर्किड फुलांच्या रोपांची लागवड केली .  सध्या साडेतीन एकर जागेत त्यांनी दीड लाखांच्या जवळपास ऑर्किड फुलांच्या रोपांची लागवड केली आहे . ऑर्किड फुलांच्या लागवडीसाठी मोठा खर्च येत असला तरी एकदा या रोपांची लागवड केली की किमान सहा ते सात वर्षे उत्पन्न मिळतं . सध्या ऑर्किड फुलाच्या एका स्टिकची किंमत 20 ते 25 रुपये मिळत असून महिन्याकाठी किमान 50 ते 60 हजार स्टिक विकल्या जात असल्याचं प्रसाद सावे यांनी सांगितलंय . त्यामुळे प्रसाद सावे यांना या शेतीपासून महिन्याकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळतंय . तर या व्यवसायात प्रसाद यांच्या पत्नी शिक्षिका असून रिकाम्या वेळात त्यांना मदतीचा हात देत असतात.


 सध्या सुशिक्षित तरुण नोकरीनिमित्त शहरांकडे वळत असून यामुळे आपल्या पारंपरिक शेतीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत . मात्र याच शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास या तरुण शेतकऱ्यांना आपली आर्थिक घडी मजबूत करण्यात फार काळ लागणार नाही हे प्रसाद सावे यांनी सिद्ध केल आहे .