Palghar News:  घरोघरी नळ नसल्याने आजही अनेकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दुर्गम भागात हे नेहमीचं चित्र आहे. उन्हाळ्यात परिस्थिती आणखी विदारक होते. पाण्यासाठी होणाऱ्या वणवणमध्ये सर्वाधिक हाल महिलांचे होतात. पाण्यासाठी आईची  होणारी वणवण बघवत नसल्याने पालघर मधील केळवे धावंगेपाडा येथील मुलाने घराच्या आवारात विहीर खोदली आहे. या मुलाचे वय अवघे 14 वर्ष आहे. 


पालघर मधील केळवे मधील धावांगेपाड्यातील सालकर दांपत्य राहत आहे. दर्शना आणि रमेश हे दोन्ही पती-पत्नी  बागायतदार वाडीत मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मोलमजुरी करून संध्याकाळी घरी परतल्यावर दर्शना यांना आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. मात्र आईची ही पाण्यासाठी रोजची होणारी धावपळ मुलगा प्रणय याला बघवली नाही. शेवटी आठवीत शिकणाऱ्या अवघ्या 14 वर्षाच्या प्रणयने आपल्या घराच्या आवारातच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे प्रणयने घराच्या आवारातच विहिरीचं खोदकाम करण्यास सुरुवात केली. घरातील शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचा वापर त्यासाठी केला.  प्रणयने चार दिवसात 18 फुटांपेक्षाही जास्त खोल विहीर खोदली. अखेर या विहिरीला 18 फूटानंतर पिण्या योग्य पाणी  लागलं आणि प्रणयच्या भगिरथी प्रयत्नांना यश मिळाले.


प्रणयने केलेली जिद्द , हिम्मत आणि मेहनत यांच्या जोरावर आपल्या आईचा पाण्यासाठी होणारा त्रास कमी केला. या सगळ्यामुळे चिमुकल्या प्रणयवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. प्रणयने केलेल्या या कामाचे त्याच्या आई-वडिलांना कौतुक आहे.  पाण्यासाठी होणारी पायपीट आपली कमी झाल्याने प्रणयची आई दर्शना यांनी देखील समाधान व्यक्त केल आहे. 


आईची पाण्यासाठी होणारी धगधग पाहून प्रणयने 18 फुटांचा खोल खड्डा खोदला. या प्रयत्नाने विहिर झाल्याने  त्याने आपल्या आईचा त्रास कमी केला. प्रणयने केलेली ही गोष्ट जगावेगळी नाही. मात्र, त्याने दाखवलेली हिम्मत आणि मेहनतीचं आज सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. विहिरीला पाणी लागेल की नाही हा विचार प्रणयने केला नाही. पण, आपल्या आईचा त्रासव कमी करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. याचेच कौतुक अधिक केले जात आहे. 


राज्यात पाणी टंचाईचे संकट?


राज्यात उन्हाचा चटका वाढतोय, त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे. त्यातच पाण्याची पाणीपातळी घसरत आहे. बोअरवेल आणि विहिरीतील पाणी देखील कमी होत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. कुठे शासकीय तर कुठे खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातील 70 गावं आणि 204 वाड्यांवर 75 टँकरद्वारे सद्या पाणीपुरवठा केला जात आहे.