पालघर : पालघर(Palghar News) जिल्ह्याच्या पूर्वेस असलेल्या जव्हार मोखाडा या दुर्गम भागात पावसाळ्यात तांदूळ, नागली, वरई, उडीद हे मुख्य पिकं घेतले जाते. मात्र पावसाळ्यानंतर येथील अनेक कुटुंब ही रोजगारासाठी मुंबई नाशिक या महानगरांमध्ये स्थलांतरित होतात हेच स्थलांतरण रोखण्यासाठी डहाणू येथील कृषी विज्ञान केंद्र कोसबाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाड्यातील हिरवे मोऱ्हांडा या भागातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत भुईमुग उत्पादनातून आपली आर्थिक घडी मजबूत केली आहे 


जव्हार मोखाडा  या भागात पावसाळ्यानंतर उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने येथील अनेक कुटुंब ही महानगरांकडे रोजगारासाठी स्थलांतरित होतात.  यामुळे या भागाला अनेक समस्या भेडसावत असून स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून 2014 मध्ये डहाणूतील कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेऊन मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातील मोऱ्हांडा या भागाची पाहणी केली. या भागात पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने या भागात भुईमुगाचे उत्पन्न चांगलं येईल या उद्देशाने येथील गावकऱ्यांना एकत्र आणत कृषी विज्ञान केंद्र कोसबाड यांच्या मार्गदर्शनाखाली पाच ते सहा एकर वरती भुईमुगाची लागवड केली.


 आज या परिसरात जवळपास 200 शेतकऱ्यांनी एकत्र येत दीडशे ते पावणे दोनशे एकर वरती भुईमुगाची लागवड केली असून यातून त्यांना चांगलं उत्पन्नही मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी गादीवाफा पद्धत तर काही शेतकऱ्यांनी ड्रीप चा वापर करून या ठिकाणी भुईमुगाची लागवड केली असून यातून त्यांना 28 हजार ते 50 हजारापर्यंत एकरी मागे नफा मिळतोय. तर सिंचन व्यवस्थेसाठी काही सामाजिक संस्थांनी हातभार लावून त्यांना सौर ऊर्जा प्लांट उपलब्ध करून दिले आहेत.


पालघर जिल्ह्याच्या पूर्वेस असलेल्या जव्हार मोखाडा या भागात सरासरी अडीच हजार मी मी इतक्या पावसाची नोंद दरवर्षी होते . मात्र या भागातील पाण्याचं योग्य नियोजन नसल्याने येथील शेतकऱ्यांना रोजगारासाठी आपली घर सोडावी लागतात डहाणूतील कोसबाड कृषी केंद्राच्या मार्गदर्शनाखाली येथील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत भुईमुगाची लागवड केली असून त्यासाठी त्यांना उत्तम बाजारपेठ ही उपलब्ध झाले आहेत त्यामुळे येथील अनेक कुटुंबांचा स्थलांतरण सध्या थांबलं असून आपल्या शेतीत येथील शेतकरी उत्पन्न घेऊन आपली आर्थिक घडी मजबूत करू लागले आहेत .


जव्हार मोखाड्यातील रोजगारासाठी  होणार स्थलांतरण रोखण्यासाठी सरकारकडून नवनवीन उपायोजना केल्या जातात. मात्र त्याला यश येताना दिसत नाही त्यामुळे कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमानंतर सरकारनेही त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना आपले शेतात रोजगार उपलब्ध करून देण्याची वेळ आता निर्माण झाली आहे