पालघर : वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच घरातील तिघांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. आई आणि तिच्या मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये मृतदेह आढळून आला. जवळपास 12 दिवसांपासून संपर्काच्या बाहेर असलेल्या या कुटुंबाचे अशा पद्धतीने मृतदेह आढळल्याने ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मूळचे गुजरात येथील असलेले मुकुंद बेचरदास राठोड (वय 75), कंचन मुकुंद राठोड (वय 65) आणि मुलगी संगीता मुकुंद राठोड (वय 52) हे कुटुंबीय नेहरोली या गावात वीस वर्षांपासून राहत होते. 18 ऑगस्ट पासून हे कुटुंब संपर्काच्या बाहेर असल्याने राजकोट येथे फॅब्रिकेशन व्यवसाय करत असलेला त्यांचा मुलगा सुहास शोध घेण्यासाठी नेहरोली येथे आला.
मुलाने कुलूप तोडले
नेहरोली येथील घराला बाहेरून कुलूप असल्याने कुटुंब आजारी तर नाही ना या आशेने आजूबाजूचे सर्व दवाखाने सुहास यांनी तपासून पाहिले. आपल्या कुटुंबाचा कुठेही शोध लागला नसल्याने अखेर घरातील काही कागदपत्रे काढण्याच्या उद्देशाने कुलूप फोडले व यावेळी घरातील दृश्य बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.
आई-मुलीचा मृतदेह बंद पेटीत सापडला
आई आणि मुलीचा मृतदेह एका बंद पेटीमध्ये आढळून आला तर वडिलांचा मृतदेह बाथरूम मध्ये पडलेला त्यांना दिसला. अनेक दिवसांपासून मृतदेह या ठिकाणी पडल्याने ते कुजलेल्या अवस्थेत होते. मृतदेहांचा बाहेर वास येऊ नये या उद्देशाने बहुदा मृतदेहांवर जाड गाद्या टाकण्यात आल्या होत्या. तात्काळ या घटनेची वाडा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या वाडा पोलीस घडलेल्या घटनेचा तपास करत आहेत. आपल्या कुटुंबीयांची हत्याच झाल्याचा संशय सुहास यांनी व्यक्त केला आहे.
ही बातमी वाचा :