पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यात आदिवासी उपाय योजनेतून कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने सूर्या प्रकल्प अंतर्गत धामणी धरणाची उभारणी केली. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी हा उपयायोजना करण्यात आली होती. पण दिवसागणिक सूर्या प्रकल्पांच्या कालव्यांची वाताहत होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे सिंचन क्षेत्रात घट होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शासनाने डोळ्यासमोर ठेवलेला हा उद्देश सध्या धुसर होत चालल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे शेतकरी वर्गातून देखील तीव्र नाराजीचे सूर उमटत चालले आहेत.
पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर शेती झाल्यानंतर पालघर मधील ग्रामीण भागातील अनेक कुटुंब ही रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित होतात. हेच स्थलांतरण रोखण्यासाठी शासनाने आदिवासी उपाय योजनेतून कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत धामणी येथे धरण उभारण्याचा निर्णय घेतला. या धरणातून पालघर, डहाणू आणि विक्रमगड या तीन तालुक्यांमधील 14 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली गेली. या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यास देखील मदत झाली.
कालव्यांची अवस्था दयनीय
पण सध्या या कालव्यांची स्थिती मात्र गंभीर झाल्याचं सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवणारे कालवे आणि मुख्य कालव्यांचीच दयनीय अवस्था झालीये. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भगदाड पडलीयेत. यामुळे सिंचनाखाली येणारे क्षेत्र कमी होत असल्याने येथील अनेक कुटुंबांवर पुन्हा एकदा स्थलांतरणाची वेळ ओढवली. म्हणून येथील कालव्यांची सुधारणा करुन नंतरच पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय.
सिंचन क्षेत्रात घट
सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून उजवा तीर कालवा आणि गावातील कालवा या कालव्यांमार्फत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवलं जातं. धरण उभारलं त्यावर्षी जिल्ह्यातील 14 हजार क्षेत्र ओलिताखाली आणण्यात आलं होतं. आता मात्र कालव्यांची झालेली दुरावस्था आणि सिंचनाला देण्यात आलेलं महत्त्व यामुळे सिंचन क्षेत्र दिवसेंदिवस घटताना दिसून येतेय. यामुळे जोपर्यंत कालव्यांची सुधारणा केली जात नाही तोपर्यंत कॅनलमार्फत पाणी न सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय.
कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने सध्या या कालव्यांच्या दुरुस्तीकडे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केल्याचं देखील म्हणणं आहे. त्यामुळेच हे कालवे अनेक ठिकाणी जीर्ण झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे पाण्याचा अपव्यय देखील होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांचे देखील नुकसान होऊ शकते. म्हणूनच शेतकऱ्यांनी केलेली कालव्यांची दुरुस्तीची मागणी पाटबंधारे विभाग आता तरी गांभीर्याने घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.