Maharashtra Palghar News: भारतातील (India News) वारली चित्रकला साता समुद्रापार पोचली असून प्राचीन वारली पौराणिक कथा समकालीन युगात पुन्हा प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या डहाणू तालुक्यातील गंजाड येथील मयूर आणि तुषार या वायडा बंधूंच्या वारली कलेवर आधारित आणि नैसर्गिक शेती पद्धतीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या 'सीड' या पुस्तकाचे हस्तनिर्मित मर्यादित आवृत्तीचे प्रकाशन अलीकडेच जर्मनी (Germany) येथे झाले आहे.


सीड या पुस्तकाचे प्रकाशन 13 सप्टेंबर रोजी बर्लिन जर्मनी येथे स्पोअर इनिशिएटिव्ह या संस्थेच्या प्रतिनिधी यांच्या समवेत करण्यात आले. वारली चित्रकलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पालघर (Palghar) जिल्ह्यातील गंजाड देवगाव या ठिकाणी राहणाऱ्या तुषार आणि मयूर या बंधूंनी आपल्या आजोबांच्या घरामध्ये वारली कलाकृतींचे कालानुरूप झालेले अविष्कार साकारण्यासाठी स्टुडिओ स्थापन केला आहे. गावातील आदिवासी बांधवांना शिक्षण मिळावे या दृष्टिकोनातून या वास्तूमध्ये पूर्वी सुरू असलेल्या वस्तीशाळेचे परिवर्तन करून वारली समाजातील पौराणिक कथांचे पुनर कथन करण्यासाठी वायडा बंधूं गेल्या 15 वर्षांपासून प्रयत्न करत आहेत.


वारली चित्रकलेचे सांस्कृतिक महत्त्व कायम ठेवत आपल्या समाज बांधवांसाठी या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी हे बंधू प्रयत्नशील आहेत. तीन वर्षांपूर्वी समविचारी आदिवासी वारली चित्रकारांना एकत्र घेऊन त्यांना 10 दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले  होते. यामध्ये वारली चित्रकलेचे बदलते स्वरूप, प्रदेशात असणारी त्याबाबतची माहिती, गॅलरी व कला रसिकांना असणारी अपेक्षा या बद्दल माहिती दिली. वारली चित्रकला ही सजावटी कला नसून त्यामागील संस्कृती, परंपरा,चालीरीती आणि धार्मिक बोध कायम ठेवण्याबाबत या प्रशिक्षणा दरम्यान माहिती देण्यात आली. आपल्या देश- परदेशातील प्रदर्शन, प्रशिक्षण व सफरीतील अनुभव स्थानिक युवकांना करून त्यांच्यामार्फत समूह कलाप्रकार करण्याचा प्रयत्न या बांधवानी सुरू केला आहे.


'तारा बुक्स' च्या मदतीने वायडा बंधूनी सन 2019 मध्ये 'टेल टेल्स' (Tail Tales) व सन 2020 मध्ये 'द डीप' (The Deep) नावाचे हस्तनिर्मित पुस्तकांचे प्रकाशन केले होते. वारली चित्रकला आणि या चित्रांमागील सांस्कृतिक अंग कला रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे तसेच वारली दंतकथा यांची वारली चित्रांची सांगड घालत माहिती देण्याचा प्रयत्न हे तरुण करत आहेत. व्यवस्थापकीय क्षेत्रातील शिक्षण घेणारे मयूर तसेच ॲनिमेशन आणि मल्टिमीडियात शिक्षण घेणारा तुषार हे वारली चित्रकलेच्या नवनिर्मिती क्षेत्रात काम करत आहेत.


सन 2016 मध्ये या बंधूंनी जपानमध्ये कला प्रकल्प आणि प्रदर्शन आयोजित केले असून हॉन्गकॉन्ग, बेल्जियम, जर्मनी येथील कलादालनात त्यांचे स्वतंत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच या बंधूंनी आंतर सांस्कृतिक देवाण घेवाण कार्यक्रमांतर्गत जगाच्या विविध ठिकाणी वारली संस्कृतीचे जतन करत त्यातील वेगळेपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली येथील लोधी आर्ट कॉलनी मध्ये त्यांच्या समूहाने म्युरल तयार केले असून गीता वूल्फ यांच्याकडे कथन करून या पुस्तकांचे लिखाण करून घेतले आहे. वारली चित्रकला संदर्भात जिल्ह्यातील मोजक्या कलाकारांची पुस्तके प्रसिद्ध झाली असताना वेगवेगळ्या आशयाद्वारे वारली चित्रकले विषयी झालेले त्यांचे लिखाण वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.





बियाणाचा प्रवास आणि नैसर्गिक शेती, जुन्या बियाणांचे जतन 


यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांच्या प्रतिसादानंतर वायडा बंधू यांनी बियाणांच्या स्थानिक वाणांविषयी जनजागृती करण्यासाठी कथा स्वरूपात पुस्तकात मांडणी केली आहे. बियांपासून रोपांची होणारी निर्मिती आणि त्यामागील जीवशास्त्र व तत्वज्ञान याचे कथन करत या पुस्तकाला चार भागांमध्ये विभागण्यात आले आहे. बियांच्या होणाऱ्या बदला अनुरूप आकार प्रत्येक विभागाचे मुखपृष्ठ व उघडण्याची पद्धत विकसित करण्यात आली असून माणूस, प्राणी, पक्षी, हवा आणि पाण्याच्या सोबत बियांचा देशात, खंडात व जगाच्या विविध भागांमध्ये होणाऱ्या प्रवासाबद्दल माहिती केली आहे. या पुस्तकाची निर्मिती हस्तनिर्मित पेपरवर स्क्रीन प्रिंटिंगद्वारे केली असून या पृष्ठांचे हाताने बंधन केले आहे. देशामध्ये या हस्तनिर्मित मर्यादित आवृत्तीचे प्रकाशन डिसेंबर अखेरीस होऊन या पुस्तकाची किंमत 2200 रुपयांच्या जवळपास असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


मूळ वारली चित्रकलेची संकल्पना कायम ठेवून नवनिर्मितीसह नवीन स्वरूपात कला सादर करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत समकालीन वारली कलेची व्याख्या विस्तृत करण्याचा प्रयत्न करीत असून वेगवेगळ्या विषयांवर वारली चित्रकलेच्या मदतीने आम्ही कथेच्या आधारे वारली कथांचे पुन्हा कथन करण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी प्रतिक्रिया गंजाडचे (डहाणू) वारली चित्रकार मयूर वायडा यांनी दिली आहे.