मनोर, पालघर : मनोर-वाडा-भिवंडी हा तब्बल 64 किलोमीटरचा राज्य महामार्ग करोडो रुपये खर्च करूनही अजून खड्ड्यातच आहे. त्यामुळं वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात महाकाय धोकादायक खड्ड्यांचे साम्राज्य पसरलं असून संपूर्ण रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. तर या महामार्गावर असलेल्या नद्यांवरील मोठ्या पूलांवर धोकादायक खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. अवजड वाहने आणि लहान वाहनांना त्याचप्रमाणे बाईकस्वार आणि प्रवाशांना कसरतीचा सामना करत आपली वाहन धोकादायक परिस्थितीत चालवावी लागत आहेत.


मनोर-वाडा-भिवंडी हा राज्यमार्ग मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा पर्यायी रस्ता आहे. पण 64 किलोमीटरच्या या महामार्गावर सर्वच ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही या महामार्गाची अवस्था दयनीय आहे. त्यामुळं या महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. त्याचप्रमाणे वाहन नादुरुस्त होण्याचही प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं वाहनचालक आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीसह इतरही त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गावरील देहर्जे नदीवरील करळगाव येथील पूल त्याचप्रमाणे पिंजाळ नदीवरील पाली येथील पूल  आदी पुलांवर धोकादायक खड्डे निर्माण झाले असून वाहन चालक त्रस्त आहेत. 


या महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालक प्रवासी यांचे अतोनात हाल होत असून वाहन चालकांना कमरेचे आजार इतर त्रासालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहन चालक बाईकस्वार आणि प्रवासी यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्त करण्यात यावी असे मागणी करण्यात येत आहे.


या 64 किलोमीटर महामार्गाचे काम पहिल्यांदा सुप्रीम कंपनीकडे सोपवण्यात आलं होतं हे काम सुरू असतानाच दोन टोलनाक यांच्या माध्यमातून टोल वसुली होत होती. मात्र, त्यानंतर या महामार्गावर नवीन बांधण्यात येणारे पूल हे अपूर्णच राहिले तर दुसरीकडे रस्ता बांधण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे या कामापासून सुप्रीम कंपनीला बाहेर व्हावं लागलं. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे स्वतः दायित्व घेतलं आणि स्थानिक ठेकेदारांना या रस्त्याच्या दुरुस्तीची काम देण्यात आली. मात्र, ती काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. आतापर्यंत ह्या रस्त्यावर अनेक जणांचे बळी गेले असून सातत्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने तयार करण्यास सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागले आहे. मात्र हा रस्ता आता कधीपर्यंत दुरुस्त होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.