Maharashtra Palghar News : पालघरमधील (Palghar) मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडी गावातील दोन नवजात जुळ्या बालकांचा मृत्यू झालेल्या मातेची सोनोग्राफी झाली नसल्याचं उघकीस आल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर एकाच दिवसात विक्रमी अशा 97 सोनोग्राफी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. तेही बाहेरील तज्ज्ञांकडून करण्यात आल्यामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्याची अनास्था पुन्हा एकदा उघकीस आली आहे. 


पालघर जिल्ह्यातील काही शासकीय रुग्णालयांत सोनोग्राफी सुविधा नाही. मोखाडा येथील ग्रामीण भागांत चार प्राथमिक आरोग्य केंद्रं अंतर्भूत असून आरोग्य केंद्रांत तज्ज्ञ डॉक्टरांची पदं रिक्त आहेत. मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात 83 गावं तर 73 पाडे जोडले आहेत. ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन असल्या तरी हाताळण्यासाठी एकही तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त केलेला नाही. त्यासाठी नाशिक येथील खासगी डॉक्टरची कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती करण्यात आली आहे. मे महिन्यात 148, जून महिन्यात 140, जुलै महिन्यात 136, तर ऑगस्ट महिन्यात 182 गरोदर मातांची सोनोग्राफी करण्यात आली आहे. त्यामध्ये ऑगस्टमध्ये 18 ऑगस्ट रोजी झालेल्या 97 सोनोग्राफींचा समावेश आहे. अशा प्रकारे सोनोग्राफी करण्यासाठी आठ-नऊ तासांचा अवधी लागणं अपेक्षित आहे, असं काम असेल तर कामाचा दर्जा कसा राखला जाणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.




प्रसूतीदरम्यान मातामृत्यूचं प्रमाण कमी करणं, बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या वतीनं जननी शिशू सुरक्षा, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, राष्ट्रीय पोषण मिशनसारख्या योजना सुरू केल्या आहेत. मात्र, या योजनेत सोनोग्राफी करण्यासाठी कुठलीही तरतूद नाही. खासगी सोनोग्राफी रुग्णालयात प्रत्येक वेळेला दीड ते दोन हजार रुपये येणारा खर्च गरीब कुटुंबातील रुग्णांना परवडत नाही. त्यामुळे सोनोग्राफी न करता होणाऱ्या बाळंतपणात माता, बालमृत्यू, अपंग बाळ जन्माला येणं, अशा घटना जव्हार, मोखाडा या तालुक्यांत घडल्या आहेत. 


कंत्राटी सोनाग्राफी तज्ज्ञांवर अवलंबून


गरोदरपणात प्रत्येक महिलेची किमान तीन वेळा सोनोग्राफी होणं गरजेचं असतं. सोनोग्राफी मशीन हाताळण्यासाठी सरकार कंत्राटी पद्धतीनं या पदावर नियुक्त्या करत आहे. अपुरा पगार आणि जास्त काम यांमुळे अनेकजण हे काम सोडून जातात. अनेक आरोग्य केंद्रांत तर ही यंत्रणा उपलब्ध नाही, तर जिथे आहे, तिथे ही यंत्रणा हाताळणारे तज्ज्ञ डॉक्टरच नाहीत. त्यामुळे बाहेरून तज्ज्ञ मागवावे लागत आहेत. मोखाडा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीसाठी कंत्राटी पद्धतीनं नाशिक येथील तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे डॉक्टर दर गुरुवारी सोनोग्राफी करण्यासाठी नाशिकवरून मोखाडा ग्रामीण रुग्णालयात येत असतात. निदान आदिवासी, दलित, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील महिलांसाठी विशेष योजना राबवाव्यात, अशी स्थानिक जनतेतून मागणी होत आहेत.


दरम्यान, याप्रकरणाबाबत बोलताना मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी सांगितलं की, "दर गुरुवारी गर्भवती महिलांची सोनोग्राफी केली जाते. आपल्याकडे सोनोग्राफी मशीन हाताळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे नाशिकवरून खासगी कंत्राटी डॉक्टरांना बोलावले जाते."