पालघर : पालघरमधील (Palghar News) ग्रामीण भागात सोयी सुविधांचा असलेला अभाव आणि त्यांचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे. रस्ता आणि स्मशानभूमी नसल्याने मृतदेह नदीच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून कुटुंबीय घेऊन जात असतानाचा हृदय हेलावणारा व्हिडिओ पालघरमधून समोर आला आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी (Funeral) नेण्याची वेळ आली. एवढच नाही तर स्मशानभूमी नसल्याने भर पावसात मृतदेहावर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तलासरी तालुक्यातील बोरमाळ भेंडीपाडा येथील हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.


दोन दिवसांपूर्वी बोरमाळ भेंडीपाडा येथील वयोवृद्ध असलेले मंगू धोडी यांचा मृत्यू झाला. परंतु त्या गावात स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्यसंस्कारासाठी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. मात्र या पाड्यात स्मशानभूमी नसल्याने आणि नेहमीच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मृतदेह नेण्यासाठी रस्ता नसल्याने मंगू धोडी यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह खांद्यावर घेत काळू नदीच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून हा मृतदेह दुसऱ्या बाजूला नेला. त्यानंतर या मृतदेहावर भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  या अंत्ययात्रेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांतून प्रशासानाच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. 


नेत्यांची आश्वासनं हवेत


भेंडीपाडा येथे मागील अनेक वर्षांपासून स्मशानभूमी आणि अंत्यसंस्कार कराव्या लागणाऱ्या जागेला जोडणारा पुल व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे मात्र प्रशासनाने सरकारकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गावकऱ्यांनी मागणी केल्यानंतर स्थानिक नेते आणि प्रशानाने पूल बांधण्याची अनेक वेळा आश्वासने दिली. परंतु, ही आश्वासने अद्याप हवेतच असल्याचे चित्र आहे.  त्यामुळे स्थानिक व्यावहारासह अनेक अडचणींचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. म्हणून तत्काळ या पुलाचे बांधकाम हाती घ्यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे. 


एकीकडे देश स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असतानाच आजही ग्रामीण भागात अनेक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत.  दरवर्षी पावसाळ्यात अशी पूरपरिस्थितीत निर्माण होऊन असा जीवघेणा प्रवास नित्याचाच झाला आहे. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी  या प्रश्नाकडे गांभार्याने घेण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून अचानक उद्भवलेल्या आजारात रुग्णांना हॉस्पीटलपर्यंत घेऊन जाता येईल व त्यांच्यावर तातडीने उपचार करता येतील. 


इतर महत्वाच्या बातम्या


Palghar News : दवाखाना गाठण्यासाठी गर्भवतीची डोलीतून पायपीट, आरोग्य सेवा न मिळाल्याने जुळ्या बाळांचा मृत्यू


Yavatmal News : स्मशानाविना गाव, प्रेताला अग्नी देताना गावकऱ्यांची दमछाक, संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर