पालघर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अनेक इच्छुक उमेदवार तिकीटाची फिल्डिंग लावण्यासाठी विविध पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. आता पालघरमध्ये (Palghar) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. पाच टर्म गाजवणाऱ्या माजी खासदाराच्या मुलाने काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिली आहे. तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) ते पक्ष प्रवेश करणार आहेत.


महाविकास आघाडी आणि महायुतीत (Mahayuti) निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याचा नारा दिलेल्या मनसेकडे अनेक जण पर्याय म्हणून पाहत आहेत. त्यातच पालघर तालुक्यातील काँग्रेसचे दोन प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत 13 ऑक्टोबर रोजी पक्ष प्रवेश करणार आहेत. यामध्ये माजी खासदार दामू शिंगडा यांचे सुपुत्र सचिन शिंगडा (Sachin Shingda) यांचाही समावेश आहे. 


सचिन शिंगडा विधानसभेसाठी इच्छुक


दामू शिंगडा हे काँग्रेसकडून त्यावेळच्या डहाणू लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार राहिले आहेत. दामू शिंगडा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जात. 2021 साली कोरोनाने त्यांचे निधन झाले. आता त्यांचे सुपुत्र सचिन शिंगडा हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. सचिन शिंगडा पालघर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी आहेत. काँग्रेसच्या युवक संघटनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, लोकसभा युवक काँग्रेस सरचिटणीस अशी पदे त्यांनी सांभाळली आहेत.  शिंगडा कुटुंबाचा विक्रमगड भागात जनसंपर्क दांडगा आहे. विक्रमगडमध्ये विद्यमान आमदार सुनील भुसारा हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता जवळपास नाही. 


सचिन शिंगडांनी घेतली राज ठाकरेंची भेट


त्यामुळेच सचिन शिंगडांनी मनसे प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. नुकतीच त्यांनी राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. सचिन शिंगडा यांनी 2014 मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. आता विधानसभेला ते कसे सामोरे जातात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नका; जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष नको, आरएसएसच्या भाजपला सूचना


Mumbai MLA List : मुंबईतील 36 मतदारसंघात कोणाचे आमदार? भाजपचे सर्वाधिक, उद्धव ठाकरेंचे किती? संपूर्ण यादी एका क्लिकवर