Maharashtra Palghar News: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची जबाबदारी ही आता मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री यांचीच असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी पालघरमध्ये केलं आहे. ते पालघर (Palghar News) येथे रिपाईच्या कार्यकर्ता मेळाव्याला आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं, आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही त्यांची असल्याचंही रामदास आठवले यावेळी म्हणाले.


जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी असून यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही हात नसल्याचा वक्तव्यही रामदास आठवले यांनी यावेळी केलं आहे. लाठीचार्ज करण्याचा पोलिसांचा निर्णय हा त्यांनी परस्पर घेतला असून यासाठी सरकारकडून कोणतेही आदेश दिले नसल्याचा दावाच रामदास आठवलेंनी यावेळी केला आहे. 


2024 च्या लोकसभा निवडणुकीत रिपाईला दोन जागा मिळण्यासाठी आम्ही आग्रही असून आपण शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा रामदास आठवले यांनी पालघरमध्ये पत्रकार परिषदेत केली. 2019 च्या निवडणुकीत आपला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला असला तरी सध्या आपला तिथे जनसंपर्क चांगला असून यावेळेस निश्चितच निवडून येऊ असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 


पाहा व्हिडीओ : Ramdas Athavle : पूर्वीचा भाजप हा आता तसा भाजप राहिला नाही : रामदास आठवले



भाजप म्हणजेच हिंदुत्व नाही तर आपण सगळेच हिंदू आहोत : रामदास आठवले 


भाजप म्हणजेच हिंदुत्व नाही तर आपण सगळेच हिंदू आहोत, त्यामुळे कोणी अपप्रचार करत असेल तर इतर समाजांनी त्याचा विचार न करता पूर्वीचा भाजप हा आताचा भाजप राहिला नाही, त्यामुळे आता सर्व जाती धर्मातील लोक ही भाजपला मतदान करत असल्याचं रामदास आठवले यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासात्मक बोलत असून इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा कोणताही उमेदवार नसल्यानं त्यांना जनता मतदान करणार नाही असंही आठवले यावेळी म्हणाले.