पालघर : आरक्षणासाठी मराठा समाज (Maratha Reservation) पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला कुणबी ( Kunbi Caste ) जात प्रमाणपत्र देत ओबीसी कोट्यातून (OBC Reservation) आरक्षण देण्याची मागणी होत आहे. तर, दुसरीकडे त्याला विरोधही होऊ लागला आहे.  कुणबी सेनेचा मराठा आरक्षणाला कोणताही विरोध नाही मात्र ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागत असेल तर कुणबी सेना स्वस्थ बसणार नाही असा इशारा कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिला आहे. 

Continues below advertisement

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्यासोबत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दौरा करत बोईसर मधील आरपीआयच्या कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सांगितले की, सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून धुमश्चक्री सुरू आहे. ह्या वादामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे असे म्हटले आहे. आम्ही कुणबी सेनेच्यावतीने तीव्र निषेध करत असल्याचे विश्वनाथ पाटील यांनी म्हटले. ओबीसी समूहातील 300 हून अधिक जाती आहेत. त्यात कुणबी समाजाला न्याय मिळत नाही.  पेसा सारख्या कायद्यामुळे आमचं आरक्षण शून्यावर आले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे कुणबी प्रमाणपत्रावर,  ओबीसी कोट्यातून दिले जात असेल तर कुणबी सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विश्वनाथ पाटील यांनी दिला. 

मराठा आरक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची; आठवले यांचे प्रतिपादन 

मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पालघरमध्ये केले.  पालघर येथी रिपाईच्या कार्यकर्ता मेळाव्याला आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिले असून आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही त्यांची असल्याचं आठवले यावेळी म्हणाले .

Continues below advertisement

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज हे पोलिसांची दादागिरी असून यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही हात नसल्याचा वक्तव्य ही रामदास आठवले यांनी यावेळी केलं. लाठीचार्ज करण्याचा पोलिसांचा निर्णय हा त्यांनी परस्पर घेतला असून यासाठी सरकारकडून कोणतेही आदेश दिले नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत रिपाईला दोन जागा मिळण्यासाठी आम्ही आग्रही असून आपण शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले. 2009 च्या निवडणुकीत आपला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला असला तरी सध्या आपला तेथे जनसंपर्क चांगला असून यावेळेस निश्चितच निवडून येऊ असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. 

इतर संबंधित बातमी :