भाईंदर, पालघर :  घर खरेदीसाठी गृह कर्ज घेण्यासाठी सोसायटीकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मागणाऱ्या नवीन मालकाला सोसायटीने एनओसी नाकारली आहे. आपण मराठी (Marathi) असल्यामुळे सोसायटी एनओसी देत नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तर सदनिकेच्या मूळ मालकाने सोसायटीकडे एनओसी न मागता घर खरेदी करणारा एनओसी मागत असल्याने ते देत नाही, असे सोसायटीने म्हटले आहे. मात्र, या घटनेवरून पुन्हा एकदा मराठी-अमराठी (Marathi Non Marathi Controversy )असा वाद होण्याची शक्यता आहे. 


भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीत राहणारे गणेश रणखांबे यांनी भाईंदर येथील जैन मंदिर जवळ जय श्रीपाल या इमारतीत एक सदनिका खरेदी केली आहे. घराचा व्यवहार 25 लाख रुपयांत निश्चित झाला. त्यातील सात लाख रुपये गणेश रणखांबे यांनी घर मालकाला मार्च महिन्यात दिले आहेत.  त्याची नोंदणी देखील करण्यात आली आहे. आता गणेश यांना घर मालकाला उर्वरित पैसे देण्यासाठी बॅंकेतून कर्ज काढायचे आहे. त्यासाठी सोसायटीकडून 'ना हरकत' प्रमाणपत्राची आवश्यक आहे. परंतु ते देण्यास सोसायटी टाळाटाळ करत असल्याचा आरोप गणेश यांनी केला आहे. तर, घर मालक देखील आता व्यवहार रद्द करण्याची मागणी करत आहे. गणेश यांनी सोसायटीला वकिलांतर्फे नोटीस ही दिली आहे. आपण मराठी असल्याने आपल्याला एनओसी सोसायटी देत नसल्याचा गंभीर आरोप गणेश आणि त्यांच्या पत्नीने केला आहे. 


सोसायटीच्या सचिवांनी गणेश रणखांबे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. सोसायटीमध्ये मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक ही सदस्य आहेत. सोसायटीला रुम मालक आणि गणेश यांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार माहीत नाही. नियमाप्रमाणे एनओसी बाबात घर मालकाने सोसायटीला पत्र दिलं असतं तर सोसायटीने एनओसी दिली असती. मात्र, गणेश यांनी एनओसी मागणे हे गैर आहे. ते आमचे सदस्य अजून झाले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना एनओसी दिली नाही. त्याबाबत आम्ही वकिलामार्फत आमचं म्हणणे मांडले असल्याचं सांगितलं आहे.  


न्याय मिळवून देण्यासाठी राज ठाकरेंना पत्र


गणेश यांनी आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे या प्रकरणात मनसेने उडी घेतल्यास वाद आणखी चिघळणार असल्याचे म्हटले जात आहे. 


दरम्यान, मुंबई शहर, उपनगर आणि महानगर परिसरात मराठी माणसांना घर नाकारण्यात येत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये मराठी दाम्पत्याला एका सोसायटीने कार्यालयासाठी मराठी माणसांना परवानगी नाही, असे सांगत जागा नाकारली होती. त्यानंतर कांदिवलीमध्ये परप्रांतीयांनी जय श्रीराम न म्हटल्याने मराठी युवकास बेदम मारहाण केल्याची घटना  कांदिवलीमध्ये घडली होती. मीरा-भाईंदर या भागातही मराठी माणसांना घरे नाकारण्यात येत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असते.