पालघर : जिल्ह्यात रविवारपासून अवकाळी पावसाने हजेरी (Palghar Unseasonal Rain) लावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली असून भात शेती, मिरचीची केलेली लागवड यांचे नुकसान झाले. त्याचबरोबर जिल्ह्यात सुरू असलेल्या गवत पावली खरेदी केंद्रांचाही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे .
पालघर जिल्ह्यात सध्या पूर्व भागात तयार झालेल्या भात पिकाच्या काढण्याची काम शेतकऱ्यांनी हाती घेतली असून अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे हे भात शेती सध्या संकटात सापडली आहे. वर्षभर मेहनत करून तयार केलेले भात पीक अवकाळी पावसामुळे शेतातच कोलमडून पडले. त्यामुळे भात शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या पालघरमधील शेतकऱ्यांनी आता उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न उपस्थित केला. तयार झालेला भात पीक काढण्यासाठी शेतात कापून ठेवला असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हे पीक सध्या पाण्याखाली गेल आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
पालघर जिल्ह्यात सध्या शेकडो गवत पावली खरेदी केंद्र देखील सुरू असून या अवकाळी पावसाचा त्यालादेखील मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात शेकडो गवत पावली खरेदी केंद्रे व्यापारांकडून सुरुवात करण्यात आली आहेत. या केंद्रांवर शेतकरी आपल्या शेतातील गवत आणि पावली विक्रीसाठी आणत आहेत. खरेदी केलेले गवत पावली सध्या उघड्यावरच असल्याने जिल्ह्यात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.
पालघरमध्ये रविवारी आणि सोमवारी पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दोन दिवस पावसाची हजेरी कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच शेतीवर अवलंबून असलेली ही गवत पावली खरेदी केंद्र अडचणीत सापडलेली पाहायला मिळतात.
पालघर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी हे शेतीवरच वर्षभर आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करत आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे पुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा गंभीर प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
'या' जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन
IMD नुसार, महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि अहमदनगरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ही बातमी वाचा: