पालघर :  देशभरात आज दिवाळीचा (Diwali) उत्साह पाहायला मिळतोय दिवसेंदिवस बाजारात येणाऱ्या नवनवीन वस्तू ग्राहकांना आकर्षित करतात यामुळे अनेक भागातील पारंपरिक दिवाळी (Traditional Diwali) ही लोप पावत चालली आहे. अशातच पालघर मधील आदिवासी भागात (Diwali Tribal Area) आजही पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जात असून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याने आदिवासींची ही पारंपारिक दिवाळी एक आदर्श मानली जात आहे. त्यामुळे शहरीकरण, आधुनिकीकरण आणि संस्कृतीच्या नावाखाली प्रदूषण करणाऱ्यांनी आदिवासी बांधवांकडून काही गोष्टींचे अनुकरण करावे, असे म्हटले जात आहे. 


घरासमोर ना विजेचा लखलखाट...ना आकाश कंदील...ना फटाक्यांची आतषबाजी... त्याच पद्धतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी कुटुंब आपली दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत.  घराच्या पायरीजवळ तांदळाच्या पिठाची रांगोळी त्यावर झेंडूची फुलं आणि अन्नधान्य कुटण्याचे मुसळ तर घरात प्रवेश करताच घराच्या मुख्य दरवाजावर आणि भिंतीवर शेणापासून थापलेली  शेणी आणि त्यावर जंगलात मिळणाऱ्या चिरोट्यापासून  तयार केलेली पणती असं मन प्रसन्न करणारी ही दिवाळी पालघरच्या आदिवासींकडून आजही साजरी केली जाते. 


अशी होते दिवाळीची सुरुवात... 


वसुबारस पासून सुरुवात होणाऱ्या या दिवाळीला लक्ष्मीचे पूजन करून सुरुवात होत असते.  याच दिवशी शेतातील धान्याची पूजा करून नवीन धान्य आणि कंदमुळं खाण्यास सुरुवात केली जाते. कडधान्य आणि कोणफळ उकळून सर्वात प्रथम त्याची पूजा करून त्यानंतर ही कडधान्य खाण्यास सुरुवात करण्यात येते. यावेळी पारंपारिक पद्धतीने तारपा आणि घांगळ वाजवून पूजा अर्चा केली जात असून अंगात देवी देवतांची रूप भक्तांच्या अंगात येत असल्याची आदिवासी समाजात समज आहे. संपूर्ण गावातून ह्या भक्तांची मिरवणूक निघाल्यावर गावातील महिला आरती करतात. दुसऱ्या दिवशी  गुराढोरांची पूजा केली जात असून त्यांना सजवलं जातं अशा अनेक प्रथा पारंपारिक आदिवासी दिवाळीत आहेत. 


मिठाई नव्हे तर पारंपारिक पदार्थ...


पालघरच्या पूर्व भागातील आदिवासींच्या गावपाडांवर आजही पारंपारिक दिवाळीला मोठे महत्त्व आहे या काळात मिठाई सारखे पदार्थ घरात न आणताच चाईच्या वेली वरील पानांमधील भाकरी, काकडीची भाकरी असे पदार्थ तयार केले जात असून हे पदार्थ लहान पोरांना फराळ म्हणून दिले जातात .


फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण हवा प्रदूषण होत असल्याने सरकारने सध्या या फटाक्यांवर काही निर्बंध लादले आहेत. मात्र फटाके आणि आतषबाजी यांच्याशिवाय दिवाळी सणाला दिवाळीचा रंग येत नसल्याने शहरी भागात मोठी आतषबाजी पाहायला मिळते. मात्र, अशातच ग्रामीण आणि आदिवासी भागातील ही पारंपारिक दिवाळी आजच्या आधुनिक युगाला बरच काही देऊन जाणारी आहे.