Palghar News : पालघर जिल्ह्यातील (Palghar News) दुर्गम आदिवासी भागाच्या विकासासाठी गेली अनेक वर्षे मागणी होत असलेल्या डहाणू-जव्हार-नाशिक (Dahanu Nashik Railway) रेल्वेमार्गा ऐवजी आता उमरोली-विक्रमगड-जव्हार-इगतपुरी (Umaroli Igatpuri via Jawhar) हा नवीन रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्याचा विचार पुढे आला आहे. खासदार राजेंद्र गावित (MP Rajendra Gavit) यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या पर्यायाचा विचार करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू,जव्हार,मोखाडा आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हा दुर्गम आदीवासी भाग थेट रेल्वेने जोडण्याची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांनी सुद्धा या रेल्वेमार्गासाठी अनेक वर्षे प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचासुद्धा या रेल्वेमार्गासाठी सतत पाठपुरावा सुरू होता. मात्र डहाणू-नाशिक दरम्यानच्या या मार्गात धामणी धरण, जव्हार, मोखाडा आणि त्र्यंबकेश्वर या दुर्गम तालुक्यातील लहान-मोठ्या डोंगर-टेकड्या, घाट, नद्या आणि उंच सखल भाग यामुळे हा 167 किमीचा मार्ग बनविण्यासाठी मोठा खर्च येत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा मार्ग व्यवहार्य नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने केलेल्या सर्वेमध्ये स्पष्ट झाले होते. त्याऐवजी उमरोली-विक्रमगड-जव्हार-मोखाडा-खोडाळा ते इगतपुरी हा 95 किमी अंतराचा आणि कमी खर्चात बनणारा रेल्वेमार्ग रेल्वे मंत्रालयातर्फे प्रस्तावित करण्यात आल्याचे खासदार राजेंद्र गावीत यांनी सांगितले.
नवीन रेल्वे मार्ग किती फायदेशीर?
उमरोळी ते इगतपुरी प्रस्तावित नवीन रेल्वेमार्ग हा पालघर जिल्ह्याच्या मध्य भागातून जाणारा असल्याने डहाणू ते वसई आणि जव्हार ते वाडा या पालघर जिल्ह्यातील संपूर्ण भागाला सोयीस्कर ठरणार आहे. त्याचप्रमाणे जव्हार, मोखाडा, खोडाळा, विक्रमगड हा पर्यटनदृष्ट्या अतिशय समृद्ध परंतु आधुनिक दळण वळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे दुर्गम असलेल्या या भागातील नागरीकांना पालघर जिल्हा मुख्यालयात कमीत कमी वेळेत पोचणे शक्य होणार आहे.
नवीन रेल्वेमार्गामुळे या भागातील विकासाला चालना मिळून नवीन उद्योगधंदे सुरू होऊन स्थलातराचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्याचप्रमाणे तारापूर सारखी मोठी औद्योगिक वसाहत, बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्ग हे प्रकल्प एकमेकांशी जोडण्यास मदत होणार आहे. या प्रस्तावित नविन रेल्वेमार्गाचे लवकर सर्वेक्षण व्हावे अशी मागणी खासदार राजेंद्र गावीत यांच्यावतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: