Shootout In Train: मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी (31 जुलै) गोळीबाराची घटना घडली, ज्यात आरपीएफ शिपायाने आपले वरिष्ठ सहकारी आणि तीन प्रवाशांचा जीव घेतला. जयपूर-मुंबई एक्स्प्रेस (Jaipur-Mumbai Express Firing) पालघर स्थानकाजवळ पोहोचत असताना चालत्या ट्रेनमध्ये हा गोळीबार झाला. मारेकरी आरपीएफ कॉन्स्टेबल हा त्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. गोळीबार (Firing) प्रकरणी आरोपी कॉन्स्टेबल चेतन सिंहला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शी असलेल्या ट्रेन अटेंडंटने या भयानक घटनेबद्दल सांगितलं आहे.


'...अन् त्याला पाहून कसाबची आठवण झाली'


त्या दिवशी कृष्ण कुमार शुक्ला हे जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये ट्रेन अटेंडंट म्हणून तैनात होते आणि त्यावेळी त्यांची ड्युटी फक्त B-5 कोचमध्ये होती, जिथे गोळीबाराचा प्रकार घडला. त्यामुळे शुक्ला हेही या प्रकरणाचे साक्षीदार आहेत. त्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, जेव्हा त्यांनी आरोपी जवान चेतन सिंहला कोचमध्ये रायफल घेऊन उभं असलेलं पाहिले त्यावेळी त्यांना अजमल कसाबची आठवण झाली. अगदी त्याचप्रकारे आरपीएफ जवान गोळ्या झाडत असल्याचं त्यांनी म्हंटलं. शुक्ला यांची तब्येत बरी नसल्याने ते रात्री थोडं झोपले होते.


बी-4 आणि बी-5 कोचमध्ये घडला गोळीबाराचा प्रकार


अचानक पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाला आणि त्यांना जाग आली. प्रथम त्यांना शॉर्ट सर्किट झालं असावं, असं वाटलं. हे पाहण्यासाठी ते B-5 कोचमध्ये गेले असता तिथे त्यांनी जे पाहिलं ते थक्क करणारं होतं. चेतन सिंह हातात बंदूक घेऊन उभा होता, तर ASI टिकाराम मीणा ट्रेनमध्ये खाली पडलेले होते. गोळी लागल्याने त्यांच्या आजूबाजूला रक्त साचलं होतं.


काही वेळाने आरोपी चेतन सिंह बी-4 कोचमध्ये गेला. त्यानंतर एक प्रवासी धावत कृष्णकुमार शुक्ला यांच्याकडे आला आणि त्याने सांगितलं की, आरपीएफ जवानाने दुसऱ्या एका प्रवाशावर देखील गोळी झाडली आहे. त्यानंतर चेतन सिंह पुन्हा बी-5 कोचमध्ये आला आणि टिकाराम मीणा यांच्या मृतदेहाजवळ काही वेळ उभा राहिला आणि पुन्हा बी-4 कोचच्या दिशेने गेला.


एकामागून एक चार लोक ठार


आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंहने एकामागून एक चार जणांची हत्या केली होती, ज्यात त्याचे वरिष्ठ टिकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांचा समावेश आहे. बी-4 कोचमधील मोहम्मद हुसेन बुरहानपूरवाला आणि पँट्री कारमधील सय्यद सैफुल्लाह मोईनुद्दीन आणि असगर अब्बास शेख यांची त्याने हत्या केली. सकाळी सहाच्या सुमारास मीरा रोड स्थानकाजवळ प्रवाशांनी चैन ओढून ट्रेन थांबवली, तेव्हा आरोपीने खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तितक्यात त्याला जीआरपीने पकडलं.


हेही वाचा:


Jaipur Express Firing : डोकं आणि छातीत गोळ्या लागून RPF अधिकाऱ्यासह प्रवाशांचा मृत्यू, चारही मृतांना 11 गोळ्या लागल्या